

सावंतवाडी ः माजगावचे ग्रामदैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या, रविवार 4 जानेवारी रोजी साजरा होत आहे. ‘नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणींची पाठीराखी’ अशी ख्याती असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
जत्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात सकाळी विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. त्यानंतर देवीला भरजरी वस्त्रे, सुवर्ण अलंकारआणि आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहे. देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरल्यानंतर, मंदिर सर्व भाविकांना दर्शनासाठी खुले होईल. रात्री उशिरा सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येईल, जे या उत्सवाचे मुख्य आकर्षण असेल. मिरवणुकीनंतर रात्री पार्सेकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. सोहळ्यासाठी माजगाव परिसरातील ग्रामस्थ, महिला आणि विशेषतः माहेरवाशिणी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. या उत्सवाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे मानकरी, ग्राम देवस्थान निधी कमिटी आणि माजगाव ग्रामस्थांनी केले आहे.