

मालवण : मालवण तालुक्यातील डांगमोडे येथे बिबटा नागरी वस्तीमध्ये दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान मालवण वनपाल सदानंद परब तसेच वनविभागाच्या रॅपिड रेस्क्यू फोर्सच्या कर्मचार्यांनी शनिवारी रात्री ग्रामस्थांची भेट घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
सदर बिबट्या वाडी डांगमोडे गावात प्रभाकर ठाकूर यांच्या घराबाहेर मुख्य रस्त्यावर एकाच दिवशी दोन वेळा सीसीटीव्हीमध्ये दिसून आला. 1 ऑगस्ट रोजी पहाटे 2.15 वा. तो मसुरेकडील बाजूने तसेच त्याच दिवशी रात्री 8.51 वा. तो डांगमोडे दिशेने मुख्य रस्त्यावरून जाताना दिसून आला आहे.
पोलिसपाटील शशांक ठाकूर हे आपल्या भावा सोबत गुरांना वैरण घालण्यासाठी गेले असता त्याच दिवशी तो बिबट्या अनंत ठाकूर यांच्या घराच्या बाजूला बसलेला दिसून आला होता. डोंगमोडे येथील रमेश चव्हाण यांचा कुत्रा या बिबट्याने त्याच दिवशी मारला होता.
याबाबत वनविभागाला कळविल्यानंतर शनिवारी सायंकाळी वन कर्मचार्यांनी डांगमोडे गावाला भेट देत बिबट्याच्या वावराच्या अनुषंगाने ग्रामस्थांना आवश्यक सूचना दिल्या. बिबटा त्याच भागातील असून भक्ष्याच्या शोधार्थ नागरी वस्तीत आला असल्याची शक्यता वनपाल सदानंद परब यांनी व्यक्त केली. वन विभागाच्या बचाव पथकातील अनिल गावडे, श्री. बांबर्डेकर, पोलीस पाटील शशांक ठाकूर व इतरांनी डांगमोडे गावाला भेट देत बिबट्याच्या वावराच्या अनुषंगाने पहाणी केली.