

वैभववाडी : आखवणे-भोम पुनर्वसन गावठाणात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून बिबट्याने आतापर्यंत अनेक कोंबड्या, शेळ्या, कुत्रे फस्त केले आहेत. सोमवारी पहाटे भरवस्तीत माजी सरपंच आकाराम नागप यांच्या अंगणतील कुत्र्यावर या बिबट्याने हल्ला करून त्याला उचलून घेऊन जातानाच व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पुनर्वसन गावठाणात वारंवार बिबट्याचे दर्शन घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सोमवारी पहाटे कुत्र्यांचा मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज येऊ लागला. त्यामुळे श्री. नागप यांचा मुलगा पोलिसपाटील यशवंत नागप हे घरातून बाहेर आले. त्यांची चाहूल लागताच बिबट्याने तोंडात पकडलेला कुत्र्याला रस्त्यावर सोडून पळ काढला.
यात कुत्रा गंभीर जखमी झाला. सकाळी त्यांनी आपल्या घरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता पहाटे 5 वा. च्या सुमारास बिबट्या रस्त्यावरून त्यांच्या अंगणात आल ाव पाळीव कुत्र्यावर त्यांनी झडप घातली. कुत्रा व बिबट्या यांच्यात झालेल्या झटापटीत अंगणातील खुर्च्या पडल्यामुळे त्यांचा मोठा आवाज झाला.
बिबट्याने कुत्र्याला अलगद उचलून अंगणा बाहेर रस्त्यावर नेले. या अगोदरही त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या दुसर्या घरातील सीसीटीव्हीत सुद्धा अनेक वेळा रात्रीच्या वेळी बिबट्या फिरत असल्याचे कैद झाले आहे.