

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील साळगाव -लुभाटवाडी येथील एका विहिरीमध्ये पडल्याने मादी बिबट्याचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी याबाबत पोलिस व वन विभागाला माहिती दिली. शुक्रवारी रात्री विहिरीत पडलेल्या हा बिबट्या सकाळी 11 वा.पर्यंत जिवंत होता. मात्र या बिबटयाची मृत्यूशी सुरू असलेली ही झुंज अखेर अपयशी ठरलीव त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुमारे सात तासाच्या अथक मोहिमेनंतर पोलिस, वन कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांना सायंकाळी या मृत बिबट्याला गळाने बाहेर काढले.
साळगाव- लुवाटवाडी येथे घरापासून सुमारे 200 मीटर अंतरावर ही विहीर असून यात एक बिबट्या पडल्याचे शनिवारी सकाळी ग्रामस्थांनी पाहिले. बिबट्या विहिरीत पाण्यात गटांगळ्या खात होता. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत वनविभाग व कुडाळ पोलीसांना माहिती दिली.
यानंतर या दोन्ही विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत बिबट्या विहिरीत बुडाल्याने मृत झाला. विहीर खोल असल्याने त्याचा शोध घेणे अवघड होते. मात्र पोलीस कर्मचारी अनिल पाटील, सागर देवार्डेकर यांनी दिवसभर प्रयत्न सुरूच ठेवला होता. पोलीस व वनकर्मचार्यांनी विहीरीत गळ टाकून त्याचा शोध सुरू केला. अखेर या प्रयत्नांना सायं. 6वा. यश आले व बिबटया गळाला लागला. यानंतर अलगद त्याला बाहेर काढले.
या विहिरीच्या कठड्यावरआसपासची मांजरे बसतात. त्यामुळे या मांजरांवर बिबट्याने घेतलेली झेप चुकली व तो थेट विहिरीत पडला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. बिबटया शुक्रवारी रात्री केव्हातरी विहीरीत पडला होता.
यानंतर कित्येक तास तो विहिरीत मृत्यूशी झुंजत होता. पाण्यात गटांगळ्याखात थकलेला हा बिबटा अखेर सकाळी 11 वा. च्या सुमारास पाण्यात बुडाला. रविवारी याचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती कुडाळ वनक्षेत्रपाल श्री. कुंभार यांनी दिली.