

कणकवली : कणकवलीचे सहा. पोलिस उपनिरीक्षक विनोद सुपल, हवालदार पांडुरंग पांढरे आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा पथकातील उपनिरीक्षक रामचंद्र शेळके या तिघांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी काढले.
यामध्ये श्री. सुपल आणि श्री. पांढरे यांची बदली पोलिस मुख्यालयात तर उपनिरीक्षक रामचंद्र शेळके यांची बदली पोलिस नियंत्रण कक्ष सिंधुदुर्ग येथे करण्यात आली आहे. या बदल्या म्हणजे कणकवली बाजारपेठेतील एका मटका बुकी अड्ड्यावर पंधरा दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी टाकलेल्या छापा प्रकरणाचे पडसाद आहेत.
पालकमंत्री राणे यांनी पंधरा दिवसांपूर्वी कणकवली शहरातील घेवारी यांच्या मटका बुकी अड्ड्यावर स्वतः छापा टाकून पोलिस यंत्रणेच्या डोळ्यात अंजन घातले होते.
पालकमंत्र्यांनी वारंवार सूचना करूनही त्याकडे कणकवली पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने स्वतः पालकमंत्र्यांनी मटका अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांची अकार्यक्षमता चव्हाट्यावर आणली. या प्रकरणात तडकाफडकी बदल्या करण्यात आल्याने हे प्रकरण पोलिसांना चांगलेच शेकल्याची चर्चा आहे.