

देवगड : देवगड तालुक्यातील वळीवंडे गावाचा जांभ्या कातळ सड्यावर लज्जागौरीचे कातळचित्र आढळल्याची माहिती कोकण इतिहास परिषद व देवगड इतिहास मंडळाच्या माध्यमातून पुढे आली आहे, अशी माहिती प्राच्यविद्या अभ्यासक रणजीत हिर्लेकर यांनी दिली.
गेली अनेक वर्षे या दोन्ही संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यात कातळचित्र संशोधन व संवर्धनाचे काम करीत आहेत. आतापर्यंत लज्जागौरी सदृश्य पेट्रोग्लिफ सापडल्याच्या बातम्या फोटोसह झळकल्या होत्या. पण ही चित्रे भौमितिक व थोडी वेगळ्या शैलीने कोरलेली असल्याने ती लज्जागौरीची आहेत का असे प्रश्न संशोधकांसमोर होते. पण आता देवगड तालुक्यात सापडलेल्या लज्जागौरीच्या हूबेहूब कातळ खोद चित्रामुळे हा संभ्रम दूर आला आहे असे हिर्लेकर यांनी सांगितले.
हिर्लेकर म्हणाले, प्रागैतिहासिक काळापासूनच मानवाला स्त्रीच्या सृजन शक्तीविषयी कुतूहल होते. ज्या काळात मानवाला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी भीषण संघर्षाला तोंड द्यावे लागले होते त्या काळात ही सृजन शक्ती त्याचे अस्तित्व टिकविण्यासाठी महत्वाची होती.त्यामुळे या सृजन शक्तीपुढे तो नम्र झालेला दिसतो. त्यातून लज्जागौरी सारख्या स्त्री प्रतिमांमधून शक्ती उपासनेचा उदय झालेला दिसतो. दाभोळला सापडलेले स्त्रीचे कमरेपर्यंतचे जे कातळचित्र आहे त्यातून मातृदेवतेचे सुरूवातीचे रूप पाहता येते. कुडाळ येथील खोटले गावाच्या सड्यावर सापडलेले कातळचित्र हे देखील थोडेसे अस्पष्ट शैलीतील आहे. लज्जागौरीच्या मूर्तीच्या मुखाकडे असणारे कमळाचे चित्रण या कातळचित्रात वेगळ्या प्रकारच्या फुलाचे कोरलेले दिसून येते.परंतु वळीवंडे येथील शिरविरहीत असणारे द्विभूज व उत्तानपाद स्थितीतील हे कातळचित्र लज्जागौरीची हुबेहुब प्रतिमा आहे.बदामी चालुक्यांचा काळातील लज्जागौरीची जी दुर्मिळ शिल्पे पाहावयास मिळतात त्याच्याशी तंतोतंत जुळणारी ही कातळात कोरलेली रेखाकृती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे.
याबाबत अधिक माहिती देताना हिर्लेकर यांनी चाळीसहून अधिक वैशिष्टपूर्ण कातळचित्रे सापडली आहेत.आणखी तीन कातळचित्रे ही लज्जागौरी प्रकारातील आहेत.पण यांची रचना ही भौमितिक प्रकारातील आहे.हूबेहूब लज्जागौरीच्या स्त्री प्रतिमेप्रमाणे केलेल्या या कोरीव चित्रामुळे कोकणात ठिकठिकाणी आढळणारी मातृशक्तीची वेगवेगळ्या शैलीतील कातळचित्रे ही लज्जागौरीचीच असल्याचे स्पष्ट होते. ही साईट नंदू साळसकर यांच्या माध्यमातून पोहचली. अजित टाककर, योगेश धुपकर, लक्ष्मण पाताडे, किरण पांचाळ, महेंद्र देवगडकर यांचे सहकार्य कातळचित्रांचा शोधकार्यात लाभले. देवगड तालुक्यात नव्याने सापडलेल्या या कातळचित्रामुळे कातळचित्रांच्या नकाशावर देवगड स्थान महत्वपूर्ण ठरणार आहे.