

देवगड : ‘दक्षिण कोकण’ची काशी म्हणून प्रसिद्ध श्री कुणकेश्वर मंदिर येथे श्रावण महिन्यातील तिसर्या सोमवार निमित्त ॐ नम: शिवाय गजरात पहाटेपासूनच मंदिर परिसर गजबजून गेला होता. पहाटे 5 वा. पासून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पहाटे सहायक धर्मदाय आयुक्त श्रीमती अवंतिका कुलकर्णी तसेच कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली यांना पहिल्या पूजेचा मान देण्यात आला. पूजा विधि झाल्यानंतर स. 6 वा. पासून भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले. त्यानंतर दिवसभर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तसेच कोकणातील इतर भागांमधून हजारो शिवभक्त दर्शनासाठी आले होते. भाविकांच्या सोयीसाठी देवगड आणि कणकवली येथून जादा गाड्यांचीही व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळपर्यंत मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता.
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तसेच सामाजिक क्षेत्रातील मंडळीनी कुणकेश्वर मंदिरात श्री शंभू महादेवाचे दर्शन घेतले. भाविकांच्या सुव्यवस्थेसाठी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट व देवगड पोलीस स्टेशन यांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अडचण किंवा गैरसोय न होण्यासाठी स्वच्छता, वाहतूक व मार्गदर्शनासाठी स्वयंसेवकही सक्रिय होते.
श्रावण महिन्यातील तिन्ही सोमवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी श्री क्षेत्र कुणकेश्वर तीर्थक्षेत्री पहायला मिळाली. आतापर्यंत कुणकेश्वर येथे श्रावण सोमवारी येणारे भाविक खाजगी गाड्या घेऊन येत होते, मात्र यावेळी कोल्हापूर-कुणकेश्वर अशी थेट एसटीची सोय उपलब्ध करून दिल्याने सांगली, कोल्हापूर भागातील भाविकांची वर्दळ वाढली होती. भाविक, पर्यटक, पोलिस, एसटी यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा, या सर्वांचे कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष एकनाथ तेली यांनी आभार मानले.