

देवगड : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण वर्षनिमित्त राज्य पर्यटन विभागाच्या वतीने श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे ‘आंबा महोत्सव-२०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते १८ मे या कालावधीत हा महोत्सव होणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पर्यटक आणि कोकणप्रेमींनी मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभागी होऊन कोकणच्या संस्कृतीचा आणि आंब्याच्या विविध स्वादांचा आनंद घ्यावा, असे आवाहन ना. देसाई यांनी केले आहे.
या आंबा महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना हापूस आंब्यांची विक्री होणार असून, कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण स्थानिक उत्पादनेही विक्रीसाठी उपलब्ध राहतील. तसेच आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांविषयी माहिती देण्यासाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजनही करण्यात येणार आहे.
या महोत्सवात आंब्यापासून तयार करण्यात आलेल्या विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. महोत्सवादरम्यान कोकणच्या पारंपरिक संस्कृतीची झलक दाखविणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, त्यामध्ये दशावतार, पालखी सोहळा, स्वराज्य आख्यान, कोकण कलेक्टिव्ह बँड तसेच महिलांच्या सन्मानार्थ ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचा समावेश आहे. त्यामुळे पर्यटकांना कोकणच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा जवळून अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
याशिवाय कुणकेश्वर परिसरातील सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ला आणि देवगड किल्ला हे ऐतिहासिक किल्ले पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत. तारकर्ली, मालवण, देवबाग आणि कुणकेश्वर या समुद्रकिनारी स्वच्छता आणि निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. विशेषतः तारकर्ली स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगसाठी पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. सिंधुदुर्गमध्ये स्कुबा डायव्हिंग, जेट स्कीइंग, बोटिंग आणि स्नॉर्कलिंगसारख्या विविध जलक्रीडांचाही पर्यटकांना आनंद घेता येणार आहे. येथील डॉल्फिन सफारीही विशेष आकर्षण ठरत आहे.
कोकणात पोहोचण्यासाठी पर्यटक मुंबई, बेंगळुरू आणि हैदराबाद येथून सिंधुदुर्ग विमानतळ येथे विमानसेवेचा लाभ घेऊ शकतात, सिंधुदुर्ग विमानतळ एमटीडीसी कुणकेश्वर रिसॉर्ट पसून ६० कि. मी अंतरावर आहे. हा विमानतळ कोकण विभागाला देशातील प्रमुख शहरांशी जलद आणि सुलभ हवाई संपर्क उपलब्ध करून देत आहे. एमटीडीसी कुणकेश्वर रिसॉर्ट कणकवली रेल्वे स्थानकापासून ६० कि. मी अंतरावर असून कोंकण रेल्वेद्वारे भारतातील इतर महत्वाच्या शहरांशी जोडले गेले आहे. तसेच मुंबई आणि पुणे येथून रेल्वे व बससेवेद्वारेही येथे सहज पोहोचता येते.
हा महोत्सव पर्यटन मंत्री शंभूराज देसाई तसेच पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात येत आहे. अपर मुख्य सचिव (पर्यटन) संजय खंदारे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, व्यवस्थापक (प्रसिद्धी) मानसी ताटके आणि प्रादेशिक व्यवस्थापक, रत्नागिरी दीपक माने हेही महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. संबंधित विभागीय अधिकारी आणि रिसॉर्ट व्यवस्थापन पथकेही पूर्ण समन्वयाने सहकार्य करत आहेत.
आंबा महोत्सवामुळे शेतकरी आणि उद्योजकांना उत्पादनवाढीसाठी नवी संधी उपलब्ध होणार आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी पर्यटन मार्गदर्शकांच्या माध्यमातून परिसरातील विविध पर्यटनस्थळांच्या भेटींचे आयोजनही करण्यात आले आहे.
पर्यटनसमृद्ध कोकणातील नैसर्गिक सौंदर्याचा, कृषीसंपदा आणि सांस्कृतिक वैभवाचा संगम अनुभवण्यासाठी ‘आंबा महोत्सव २०२६’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. कोकणतील नैसर्गिक सौंदर्याचा, कृषीसंपदा आणि सांस्कृतिक वैभवाचा संगम अनुभवण्यासाठी ‘आंबा महोत्सव २०२६’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.