कुणकेश्वर समुद्रात क्रौर्याची परिसीमा गाठणारा प्रकार; संशयित खलाशाला दोन दिवसांची पोलिस कोठडी

किरकोळ वादाचा राग मनात ठेवून तांडेलाच्या मानेवर सुरीने सपासप वार
Kunkeshwar sea cruelty incident
देवगड : जेटीवर आणलेली जळीत नौका. (छाया:वैभव केळकर)
Published on: 
Updated on: 

देवगड : कुणकेश्वर समुद्रात मासेमारी करताना नौकेवरील खलाशाने तांडेलशी झालेला किरकोळ वादाचा राग मनात ठेवून तांडेलाच्या मानेवर सुरीने सपासप वार करून त्याचे शीर धडावेगळे करून निर्घृण खून केला व यानंतर नौकाही पेटवून दिली. क्रौर्याची परिसीमा गाठणारी घटना 28 ऑक्टोबर रोजी देवगड समुद्रात दुपारी 1 वा. च्या सुमारास घडल होती. याप्रकरणी देवगड पोलिसांनी अटक केलेल्या संशयित जयप्रकाश धनवीर विश्वकर्मा (27, रा.तपकरा, बाधरकोना जशपुरनगर छत्तीसगड) याला मंगळवारी देवगड न्यायालयासमोर हजर केल्यानंतर 31 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. विश्वकर्मा याने पोलिसांसमोर आपल्या कृत्यांची कबुली दिली आहे.

दरम्यान, जळीत नौका देवगड बंदरात आणण्यात आली आहे. या नौकेेवरील उर्वरित 24 खलाशांनाही सोमवारी सायंकाळी उशिरा देवगड बंदरात आणल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मंगळवारी जळीत नौका देवगड जेटीनजीक सुरक्षित स्थळी लावून नौकेत साचलेले पाणी पंपांच्या सहाय्याने स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने काढण्याचे काम दिवसभर सुरू होते. पाणी काढून झाल्यानंतर पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमने मयत तांडेलाचे नौकेतील मृतदेहाचे अवशेष ताब्यात घेेतले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नुमान रफिक फणसोपकर व अरफात हमीद फणसोपकर (रा. राजीवाड, रत्नागिरी) यांच्या मालकीची नुजत राबीया नौका 28 ऑक्टो. रोजी दुपारी 12 वा. कुणकेश्वर समुद्रात मासेमारीसाठी आली. नौकेवरील सर्वांचे जेवण झाल्यानंतर दुपारी 1 वा. मासेमारीकरिता जाळे पाण्यात टाकले. दरम्यान नौकेवरील दिलदार शेख (39, रा.बरगी, कुमटा, कारवार-कर्नाटक) यांना खलाशांचा ओरडण्याचा आवाज आला. ही ओरड ऐकून नौकेच्या केबीनमध्ये असलेले शेख बाहेर आले. यावेळी खलाशांपैकी प्रमोद रजाक यांनी ‘जयप्रकाश विश्वकर्मा तांडेल रवींद्रको सुरीसे मार रहा है’ असे ओरडला. हे एकून तेथे धाव घेतलेले शेख यांनी विश्वकर्मा यांने तांडेल रवींद्र नाटेकर याचे शीर हातात पकडून नौकेच्या समोरील भागाच्या नाळीवर ठेवताना पाहीले.

हा प्रकार पाहून हादरलेल्या शेख यांनी नौकेवरील वायरलेसच्या मदतीने इतर नौकांना कॉल देवून मदतीसाठी बोलावून घेतले. दरम्यान विश्वकर्माचे हे क्रूर कृत्य पाहून हादरलेल्या इतर खलाशांनी भीतीने नौकेतून थेट समुद्रात उड्या मारल्या. त्यानंतर विश्वकर्मा याने नौकेमधील स्टोव्हमधील डिझेल नौकेवरील मासेमारी जाळ्यांवर व नौकेवर ओतत नौकेला माचिसने आग लावून ती पेटवून दिली. हे पाहिल्यानंतर दिलदार शेख यांनीही पाण्यात उडी मारली. नौकेला पूर्णपणे आगीने वेढल्यानंतर संशयित विश्वकर्मा यांनेही पाण्यात उडी मारली व मदतीकरिता आलेल्या इतर नौकेवर चढला, अशी माहिती फिर्यादी दिलदार शेख यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली.

या तक्रारी नुसार पोलिसांनी जयप्रकाश विश्वकर्मा याच्याविरूध्द कलम 103(1), 109, 327(2), 138 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला देवगड न्यायालयासमोर मंगळवारी हजर केल्यानंतर न्यायालयाने 31 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. अधिक तपास पोलिस निरिक्षक अरूण देवकर करीत आहेत.

देवगड समुद्रात सोमवारी दुपारी ही घटना घडल्यानंतर स्थानिक मच्छिमार, मत्स्यव्यवसाय विभाग, पोलिस, सागर पोलिस शाखा, सागर सुरक्षा रक्षक तसेच रत्नागिरी येथील नौकांच्या सहकार्याने या नौकेवरील खलाशांना सुखरूप इतर नौकांवर घेण्यात आले. तर हे कृत्य करणारा खलाशी जयप्रकाश विश्वकर्मा याला सागर पोलिस शाखेच्या गस्ती नौकेने देवगड बंदरात आणण्यात आले. नौकेवरील इतर खलाशांना इतर नौकांच्या सहाय्याने सोमवारी रात्री देवगड बंदरात आणण्यात आले. त्यांना कोणतीही दुखापत झाली नव्हती मात्र ते घाबरलेल्या स्थितीत होते. त्यांची ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर सुरक्षितस्थळी त्यांना ठेवण्यात आले. जळीत नौकाही आग आटोक्यात आणल्यानंतर देवगड बंदरात आणण्यात आली. ही नौका देवगड जेटी येथे सुरक्षित स्थळी रात्री ठेवण्यात आली.

या घटनेची माहिती मिळताच अति. पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावले, कणकवलीचे पोलिस उपअधीक्षक घनश्याम आडाव यांनी रात्री देवगडमध्ये येवून माहिती घेतली. मंगळवारी सकाळी देवगड जेटी येथे लावण्यात आलेल्या जळीत नौकेमधील भरलेले पाणी नौका मालक व त्यांचे सहकारी यांनी स्थानिक मच्छिमारांची मदत घेवून भरलेले पाणी तसेच नौकेची जळालेली केबीन, डोल व इतर साहित्य काढून जेटीवर सुरक्षित ठेवले. पंपाने पाणी काढण्याचे काढण्याचे काम दिवसभर सुरू होते. देवगड पोलिसांनी सिंधुदूर्ग फॉरेन्सिक टीमला पाचारण केल्यानंतर ही टीम दाखल झाली. जळीत नौकेतून पाणी काढल्यानंतर मयत तांडेल याच्या हाडांचे काही अवशेष सापडले. या अवशेषांची तपासणी कोल्हापूर व सिंधुदुर्ग फॉरेन्सिक टीम करणार आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news