

देवगड : श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर यांच्या वतीने यंदा 22 ऑक्टो. रोजी दीपावली पाडवानिमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर दीपोत्सव 2025 भक्तिभावात आणि सांस्कृतिक उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या वर्षी दीपोत्सवनिमित्त श्री कुणकेश्वर मंदिर परिसरात 21 हजार पणत्या प्रज्वलित करण्यात येणार आहेत, अशी माहिती कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हा दीपोत्सव बुधवार 22 रोजी सायं. 6 वा.पासून सुरू होईल. मंदिर परिसर दीपोत्सवाच्या प्रकाशात उजळून निघणार असून, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भाविकांना भक्तिमय अनुभव मिळणार आहे. यावर्षीच्या दीपोत्सवात मंदिर परिसरामध्ये रांगोळी प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच 21 हजार पणत्यांची आरास करण्याचा संकल्प देवस्थान ट्रस्टच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. हा दीपोत्सव सर्वासाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. ट्रस्टच्या वतीने सर्व भाविकांना सहभागी होऊन दीपोत्सव यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दिवाळी निमित्त आयोजित कार्यक्रमात स्वर श्रीपाद या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. या मैफिलीत प्रसिद्ध गायक श्रीपाद शांताराम जाबोडकर (मडगाव,गोवा) तसेच गायिका करिष्मा शेटकर (गोवा), युवा गायक साईश नाईक (गोवा) यांचे गायन होणार आहे. त्यांना केतन च्यारी (की बोर्ड सिन्थेसाईझर), राज मडगांवकर (तबला), प्रतीक धामस्कर (संवादिनी), प्रतीम धामस्कर (पखवाज /टाळ) अशी संगीत साथ देणार आहेत. सूत्रसंचालन सौ. अलीशा नाईक करणार आहेत.
मुख्य मंदिरामध्ये मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन सायं. 7 वा.मंदिर व परिसरातील दीपप्रज्वलन सोहळा 7.15वा. स्वर श्रीपाद (गोवा) सांज मैफल 6 ते 8.30, सन्मान सोहळा रात्री 8.30 ते 9 वा., पालखी प्रदक्षिणा सोहळा रात्री 9 ते 9.30 वा.,सांगता रात्री 9.30 वा. आदी कार्यक्रम होणार आहेत अशी माहित एकनाथ तेली यांनी दिली. देवस्थान ट्रस्टचे खजिनदार उदय पेडणेकर, सरपंच महेश ताम्हणकर, संजय वाळके, महेश जोईल, व्यवस्थापक रामदास तेजम आदी उपस्थित होते.
या दीपोत्सव निमित्त श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे सर्व भक्तजनांना, भाविकांना आणि नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पारंपरिक उत्सवात सहभागी व्हावे आणि श्री देव कुणकेश्वरांच्या कृपेचा लाभ घ्यावा.