

ओरोस : सिंधुदुर्ग बँकेच्या आस्थापनेतील 73 रिक्त पदांसाठी 5 हजार 77 उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज नोंदणी केली आहे. या उमेदवारांना प्रशिक्षण आणि सखोल मार्गदर्शन मिळण्यासाठी येत्या 9 ऑक्टोबर पूर्वी बँकेच्या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांची नाव नोंदणी होईल, अशा सर्व उमेदवारांना 13 ऑक्टोंबर टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, उमेदवारांनी कोणाच्याही आमिषाला बळी पडू नये बँकेची भरती अत्यंत पारदर्शकपणे होणार असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सिंधुदुर्गनगरी येथे बँकेच्या प्रधान कार्यालयात येथील बँकेच्या सभागृहात सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. संचालक व्हिक्टर डॉन्टस, महेश सारंग, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे आदी उपस्थित होते.
दळवी म्हणाले, जिल्हा बँक म्हणून संचालक मंडळामध्ये यासंदर्भात चर्चा झाली. पालकमंत्री या बैठकीस उपस्थित होते. बैठकीमध्ये बँकेत पदासाठी अर्ज सादर केलेले आहे त्या सर्व उमेदवारांना बँकेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या 5 हजार 77 उमेदवारांची प्रशिक्षणा साठीची नोंदणी आहे ती 9 तारीख पर्यंत ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या वेबसाईटच्या माध्यमातून केली जाणार आहे. जे उमेदवार प्रशिक्षणासाठी नोंदणी करतील त्यांचे बॅचेस तयार करून या सगळ्या उमेदवारांना 13 ऑक्टोबर पासून प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
यासाठी उत्तम दर्जाचे प्रशिक्षण देणार्या व्यक्तींची नियुक्ती बँकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. शरद कृषी भवन, बँकेचे स्वतःचे सभागृह आणि पत्रकार भवन अशा तिन्ही ठिकाणी प्रशिक्षण होणार आहे. जवळपास संपूर्ण एक महिन्यापेक्षा जास्त काळ हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच यापुढेही बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर घडवायचे आहे, अश्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र सुरू ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे श्री. दळवी यांनी सांगितले.