

कुडाळ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बिबवणे हायस्कूल समोरील ब्रीजवर सावंतवाडी ते कुडाळ येणार्या चालत्या ज्युपिटर दुचाकीला अचानक आग लागली. दुचाकीला आग लागल्याचे लक्षात येताच स्वार युवतीने प्रसंगावधान राखून दुचाकी थांबविली. त्यामुळे सुदैवाने अनर्थ टळला. वाहनचालक व स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत पाण्याच्या सहाय्याने आग विझविली. गुरुवारी स.9 वा.च्या सुमारास ही घटना घडली.
ही युवती सावंतवाडीहून कुडाळ येथे दुचाकीने येत होती. महामार्गावर बिबवणे बॉक्सेल येथे दुचाकी आली असता दुचाकीच्या दर्शनी भागातून धूर येत असल्याचे तिने पाहिले आणि लागलीच दुचाकी थांबविली. बॉक्सेल असल्याने जवळच्या परिसरात आग विझविण्यासाठी पाणी उपलब्ध नव्हते.
युवतीने महामार्गावरून जाणार्या वाहनधारकांना थांबवून सदर घटनेकडे लक्ष वेधले. आग लागल्याचे पाहून एका चारचाकी वाहनधारकाने आपल्या गाडीतील अग्निशमन सिलेंडर आणून आग विझविण्यास सुरूवात केली.
कुडाळच्या दिशेने येणारे दुचाकीस्वार संतोष गावडे यांनी जवळच असलेल्या अरूण वेंगुर्लेकर यांच्या हॉटेलमधून पाणी आणून त्याचा मारा केला. ग्रामस्थ संतोष हळदणकर यांनीही आपल्या घरातील पाणी नेऊन पाण्याचा मारा केला. यामुळे गाडीची आग विझविली. आग वेळीच आटोक्यात आणण्यात यश आल्याने दुचाकीचे अन्य नुकसान टळले.