

कुडाळ : गावात दहशत निर्माण करण्यासाठी हातात कोयता घेवुन फिरणारा योगेश नाना गुरव (40, रा. कडावल-गुरववाडी) याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. ही कारवाई कडावल-गुरववाडी रवळनाथ मंदीर जवळ कुडाळ पोलिसांनी केली.
या घटनेची फिर्याद पोलिस कर्मचारी नंदकिशोर दत्ताराम नेरकर यांनी कुडाळ पोलिसात दिली होती. जिल्ह्यात सध्यस्थितीत 28 ऑगस्ट पर्यंत मनाई आदेश लागू आहे. असे असताना योगेश गुरव हा हातात कोयता घेवुन गावात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर हवालदार श्री. तिवरेकर, श्री. कोचरेकर हे कडावल- रवळनाथ मंदीर येथे गेले असता मंदीराकडे रस्त्यालगत असलेल्या सिमेंट पोल जवळ एक व्यक्ती हातात कोयता घेऊन फिरत असताना आढळला.
पोलिसांनी त्याला पकडून त्याच्या हातातील कोयता काढून घेतला. यावेळी त्याने आपले नाव योगेश गुरव असल्याचे सांगितले. त्याने कोयता वापरण्याबाबत समाधानकारक माहिती दिली नाही. यावरुन तो गावात दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने कोयता घेवुन फिरत असल्याचे स्पष्ट झाले.
त्याने मनाईआदेशाचा भंग केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली. त्याला अटक करून कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.