

कुडाळ : कुडाळ शहरातील नारळी पौर्णिमा रिक्षा रॅलीच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. पोलिसांनी दोन्ही गटातील सर्व रिक्षांना रॅलीमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
कुडाळ पोलिस स्टेशन येथे शिंदे गट शिवसेना व उबाठा शिवसेना तसेच संबंधित रिक्षाधारकांची नारळी पौर्णिमेच्या अनुषंगान बैठक झाली होती. यावेळी पोलिस प्रशासनाकडून या नारळी पौर्णिमेच्या तयारी संदर्भात काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या, त्यात नारळी पौर्णिमेनिमित्त होणार्या रिक्षा मिरवणुकीमध्ये दोन्ही गटाने माणसे कितीही आणावीत पण रॅलीत प्रत्येकी फक्त एकच रिक्षा असावी, अशी सक्त पोलिस निरीक्षकांनी महायुती व महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांना दिली होती.
महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी याबाबत सहमती दर्शवली होती तर महायुतीच्या पदाधिकार्यांनी ही सूचना मान्य केली नव्हती. यानंतर पोलिस प्रशासनाने याबाबत विचार विनिमय करून याबाबत वरिष्ठ पोलिस प्रशासनाचे मार्गदर्शन घेऊन रॅलीत प्रत्येकी एकच रिक्षा असावी ही अट शिथिल केली आहे.
नवीन नियमावलीनुसार दोन्ही पक्षांना पूर्वीप्रमाणे कितीही रिक्षा रॅलीत सहभागी होण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे; मात्र या रॅली दरम्यान कोणतेही वादाचे प्रसंग उद्भवू नये याची दक्षता संबंधित पदाधिकार्यांनी घ्यावी, असेही सूचित करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली. त्यामुळे सद्यस्थितीत कुडाळमधील नारळी पौर्णिमा रिक्षा रॅलीचा वाद मिटला आहे.