Kudal Nagar Panchayat-कुडाळ न. पं. सभेत 'सत्ताधारी विरूद्ध सत्ताधारी'

Kudal STP project site reservation- एसटीपी प्रकल्प जागा पाहिणीसाठी सभा काही काळ 'होल्ड', प्रत्यक्ष जागा पाहणीनंतर एसटीपी प्रकल्प जागा आरक्षणाचा ठराव मंजूर
Kudal Nagar Panchayat
कुडाळ : नाट्यगृह भूमिपूजन समारंभ मंडप खर्चावरून सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांत जोरदार शाब्दिक चकमक उडाली. (छाया: काशिराम गायकवाड)
Published on
Updated on

कुडाळ : कुडाळ-भंगसाळ नदीकिनारील स्मशानभूमीलगत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी जागा आरक्षित करण्याच्या प्रस्तावावरून कुडाळ न. पं. सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला. सत्ताधारी भाजपाच्या काही नगरसेवकांसह विरोधी नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत प्रत्यक्ष प्रस्तावित जागेची पाहणी केल्याशिवाय ठराव मंजूर करू नये, अशी ठाम भूमिका घेतली. तर काही सत्ताधारी नगरसेवकांनी आजच ठराव घेण्याचे सूचित केले. या मुद्यावरून सत्ताधारी विरूद्ध सत्ताधारी असा जोरदार सामना रंगला.

विरोधी गटाचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनीही पहिली जागेची पाहणी करून नंतर विशेष सभा बोलावण्याची मागणी केली. मात्र मुख्याधिकाऱ्यांनी सदर विषयाचा या सभेत ठराव घेणे महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सभेचे कामकाज तब्बल पंधरा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. नगराध्यक्षांच्या संमतीनंतर नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन जागेची पाहणी केली. त्यानंतर सभेचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले आणि एसटीपी प्रकल्पासाठी जागा आरक्षित करण्याचा ठराव घेण्यात आला.

Kudal Nagar Panchayat
Jal Jeevan Scheme corruption allegations - 'जलजीवन'वरून जि. प. सर्वसाधारण सभा

नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मुख्याधिकारी विनायक औंधकर, नगरसेवक तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सभेत भंगसाळ नदीकाठावरील खासगी जागा संबंधित जमीनमालकांशी वाटाघाटी करून संपादित करण्याचा विषय मांडण्यात आला. विषयाचे वाचन सुरू असतानाच उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी प्रश्नांचा भडिमार केला. संबंधित जमीनमालकांशी चर्चा झाली असेल तर हा विषय यापूर्वी सभागृहात का आणला नाही? नगरसेवकांना याची माहिती का दिली नाही? असे सवाल त्यांनी केले. नीलेश परब यांनीही प्रशासनावर नाराजी व्यक्त करत, उपनगराध्यक्षांच्या भूमिला पाठींबा दर्शवला. आम्ही नामधारी नगरसेवक आहोत का? असा सवाल त्यांनी केला.

Kudal Nagar Panchayat
सावंतवाडीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम अधांतरीच!

विरोधी ठाकरे गटाचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनीही प्रकल्प शहरासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगत प्रत्यक्ष जागेची पाहणी केल्याशिवाय ठराव मंजूर करण्यास विरोध दर्शविला. आठ दिवसांत विशेष सभा बोलावून पाहणीनंतर निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. नीलेश परब यांनी या मागणीला पाठिंबा देत मंगळवारी विशेष सभा घेण्याचा प्रस्ताव मांडला. जोरदार चर्चा सुरू असतानाच चांदणी कांबळी यांनी संबंधित जागेबाबत केवळ प्राथमिक स्तरावर जमीनमालकांशी चर्चा झाल्याचे स्पष्ट केले. नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर आणि गटनेते विलास कुडाळकर यांनी प्रथम ठराव मंजूर करून पुढील बैठकीत आवश्यक सुधारणा करता येतील, असे मत व्यक्त केले. मात्र नगरसेवक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी जिल्हा प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा होत असल्याने ठराव आजच मंजूर होणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानंतर काही नगरसेवकांनी सभा थांबवून तात्काळ जागेची पाहणी करून मगच निर्णय घेण्याचा प्रस्ताव मांडला. नगराध्यक्षांनी त्यास संमती दिल्यानंतर दुपारी सुमारे १२.१५ वा. सभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक नीलेश परब, विलास कुडाळकर, अक्षता खटावकर, चांदणी कांबळी, ज्योती जळवी, मंदार शिरसाट तसेच मुख्याधिकारी यांनी संबंधित जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी ६० गुंठ्यांपैकी ३५ गुंठे जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यासाठी ७कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. जमीनमालकांशी वाटाघाटी करून जमीन संपादित केली जाणार असल्याची माहिती दिली.

पाहणीनंतर सर्वजण पुन्हा सभागृहात दाखल झाले. दुपारी १२.३० वा. नंतर सभेचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले आणि एसटीपी प्रकल्पासाठी जागा आरक्षित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. नाट्यगृह मंडप खर्चावरून खडाजंगी शहरात प्रस्तावीत मच्छिंद्रनाथ कांबळी नाट्यगृहाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी मंडप व इतर व्यवस्थेवर झालेल्या ५५ हजार रुपयांच्या खर्चाचे बिल अदा करण्याला विरोधी नगरसेवक मंदार शिस्साट यांनी आक्षेप घेतला. हा कार्यक्रम नगरपंचायतीचा होता की पक्षीय, असा सवाल करत त्यांनी उद्घाटन सोहळ्याचे फोटो दाखवत या कार्यक्रमात राजशिष्टाचार पाळला गेला नसल्याचा आरोप केला.

कार्यक्रमात पक्षीय बॅनर लावण्यात आला असताना त्याचा खर्च नगरपंचायतीने का करावा? असा प्रश्न त्यांनी केला. यावर विलास कुडाळकर, नयना मांजरेकर आणि चांदणी कांबळी यांनी आम्ही पक्ष म्हणून तेथे पक्षाचा बॅनर स्वतंत्रपणे लावल्याचे सांगत या खर्चाशी त्याचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले. नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर यांनीही तेथे नगरपंचायतीचाही अधिकृत बॅनर होता आणि त्याच्या बाजूला पक्षाचा बॅनर होता असे स्पष्टीकरण दिले. मात्र मंदार शिरसाट यांनी याबाबत प्रशासनाने खुलासा करण्याची मागणी करीत न.पं. प्रशासनाचा राजकीय अजेंडा आहे का? असा सवाल केला. यावरून विलास कुडाळकर आणि मंदार शिरसाट यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. नयना मांजरेकर व चांदणी कांबळी यांनीही शिरसाट यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. बॅनरवर मुख्यमंत्र्यांचा फोटो नाही, उपनगराध्यक्षांचेही नाव नाही.

आम्हाला विधानसभा सदस्यांचा आदरच आहे, आमचा शहराच्या विकासाला कोणताही विरोध नाही. परंतु अशाप्रकारे अचानक ५० हजार रूपये खर्च करणे ही रक्कम कमी वाटते का?, या कार्यक्रमाचा विषय सभागृहात अगोदर ठेवणे आवश्यक होते असे ते म्हणाले. निलेश परब यांनीही शिरसाट यांच्या प्रश्नांना प्रशासनाने उत्तर देण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी सदर कार्यक्रमात न.पं. प्रशासनानेही बॅनर लावला होता. तेथे बाहेरच नारळ वाढवून भूमिपूजन केले जाणार होते, परंतू अचानक पाऊस सुरू झाल्याने कोणताही पर्यायच नसल्याने शेवटी आतमध्ये कार्यक्रम घ्यावा लागला, असे स्पष्ट केले, मुख्याधिकाऱ्यांनी दिलेले स्पष्टीकरण इतिवृत्तात नोंद करण्याची मागणी शिरसाट यांनी करीत प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.

शहरातील जागेबाबत दिलेला नाहरकत दाखला रद्द करण्याबाबत न.पं.ला अपिल करावे लागेल, असे भूमिअभिलेख विभागाने कळविल्याच्या पत्राचे वाचन करण्यात आले, असता यावर नगरसेवकांनी संबंधित वकिलांशी चर्चा करून नंतरच निर्णय घेण्याचे सूचित केले. शहरातील २७ पैकी फक्त ६ सार्वजनिक विहिरींची साफसफाई करण्यात आल्याची माहीती सभागृहात देण्यात आली. सभेत विविध विषयांवर नगरसेवकांनी चर्चा घडवून आणली. यावेळी नगरसेवक अॅड. राजीव कुडाळकर, आफरीन करोल, श्रुती वर्दम यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news