

सिंधुदुर्गनगरी : अजेंड्यावरील विषयांपेक्षा आयत्या वेळच्या मुद्द्यांवरून झालेला जोरदार गदारोळ, जलजीवन योजनेतील भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, शिक्षण विभागातील अनागोंदी आणि कामचुकार अधिकाऱ्यांची कानउघाडणी यामुळे जि. प. सर्वसाधारण सभा वादळी ठरली. अजेंड्यावरील ४५ विषयांवर अवघ्या दीड तासात चर्चा आटोपणाऱ्या सदस्यांनी आयत्या वेळच्या विषयांवर मात्र दीड तास प्रशासनाला घाम फोडला.
अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने प्रशासन बॅकफूटवर आले होते. सिंधुदुर्गनगरी येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही सभा झाली. समेत जि. प. उपाध्यक्ष तुकाराम साईल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, सभापती संतोष साटविलकर, प्रितेश राऊळ, रुहीता तांबे, अनुराधा नारकर यांच्यासह जि. प. सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते. जलजीवनच्या कामावरून गदारोळ जलजीवन मिशन योजनेची रखडलेली कामे आणि प्रशासकीय दिरंगाईचा मुद्दा उपस्थित होताच सभागृहात तीव्र चर्चा सुरू झाली. जलजीवनचे काम कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळेच रखडले असून अशा कर्मचाऱ्यांची थेट बढतर्फी झाली पाहिजे, अशी मागणी रुपेश कानडे यांनी केली.
तर रुपेश पावसकर यांनी जलजीवनच्या कामात आणि पाईप खरेदीत करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा थेट आरोप केला. या आरोपावर दीपक नारकर यांनी आक्षेप घेत पुराव्याशिवाय 'भ्रष्टाचार' असा शब्द वापरू नये आणि तो रेकॉर्डवरून काढून टाकावा अशी मागणी केली. यावर मध्यस्थी करत संदीप गावडे यांनी जलजीवनची कामे करताना ग्रामपंचायतींना विश्वासात घेण्याची आणि सदस्यांनी पुराव्यानिशीच आरोप करण्याची सूचना केली. अध्यक्ष प्रमोद कामत यांनी सदस्यांनी पुराव्यासह बोलण्याचे आणि ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊनच कामे करण्याचे आदेश दिले.
पोषण आहारात निकृष्ट मसाला अंगणवाडी आणि शाळांमध्ये पुरवला जाणारा कांदा-लसूण मसाला निकृष्ट दर्जाचा असून तो पावसाळ्यात टिकत नाही, असे सांगत दीपालक्ष्मी पडते यांनी मसाल्याचे पाकीट सभागृहात दाखवले. शाळांमध्ये सिंधुदुर्गातीलच स्थानिक मसाला वापरण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. याला संदेश सावंत व सौ. वाळके यांनी पाठिंबा देत चर्चेत सहभाग घेतला.
चुकीची माहिती देणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाईची जोरदार मागणी..!
समेत शिक्षण विभागातील भोंगळ कारभार आणि कर्मचाऱ्यांच्या मुजोरीवरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. मागील समेत चुकीची माहिती देऊन सभागृहाबाहेर पळ काढणाऱ्या कर्मचाऱ्यावर अद्याप कारवाई का झाली नाही? असा थेट प्रश्न सौ. सुमेधा पाताडे यांनी केला. तर संदेश सावंत यांनी "असे अधिकारी जागेवरच सस्पेंड (निलंबित) झाले पाहिजेत, अशी मागणी केली. त्या कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, जेणेकरून यापुढे दुसऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची अशी हिम्मत होणार नाही, असे रुपेश कानडे यांनी ठणकावून सांगितले. यावर उत्तर देताना मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी संबंधित कर्मचाऱ्याला नोटीस बजावण्यात आली असून उत्तर आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.
दरम्यान, शिक्षण विभागातील विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवल्यामुळे आपल्याविरोधात सूडबुद्धीने माहिती अधिकारात अर्ज टाकून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्याचा आरोप प्रमोद रावराणे यांनी केला आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात बोलायचे की नाही? असा सवाल त्यांनी केला. यावर संदेश सावंत यांनी प्रशासनाने या प्रकाराची अत्यंत गंभीर दखल घ्यावी, अशी सूचना केली.
एसटी आणि शौचालयांचे प्रश्न
वैभववाडी तालुक्यातील एसटीच्या फेऱ्या व स्टॉपवर शौचालयांची सोय नसल्याने विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय प्रमोद रावराणे व स्वाती इस्वलकर यांनी मांडली. यावर गुरुवारी स. ११ वा. एसटी अधिकारी व सदस्यांची विशेष बैठक घेण्याचे अध्यक्षांनी निश्चित केले. हायवेवरील बकाल शौचालयांच्या मुद्द्यावर अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले. कुरंणगवणे वाडीत गेली ३० वर्षे लाईट नसल्याची खंत प्राची इस्वलकर यांनी व्यक्त केली. तर स्कायमेटची केंद्रे बोगस असून कंपन्यांशी साटेलोटे असल्याचा आरोप मायकल डिसोजा यांनी केला. या मुद्द्यावर सुमेधा पाताडे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. याप्रकरणी १० ऑगस्ट रोजी मंत्रालयात बैठक असल्याचे उपस्थित महिला अधिकाऱ्यांनी सांगितले
सदस्यांच्या गोंधळावर संदीप गावडे आक्रमक..!
सर्वसाधारण सभेत चर्चेदरम्यान उपस्थित सदस्य एकाच वेळी आणि मधोमध बोलत असल्यामुळे नेमके कोण काय बोलत आहे, हे कोणालाच समजत नव्हते. सभागृहातील या गोंधळावर संतप्त होत संदीप गावडे यांनी, आम्हाला बोलण्याची संधी मिळणार आहे की आम्ही नुसते ऐकण्यासाठीच सभागृहात आलो आहोत? समाशास्त्राचे नियम व काही तरी शिस्त पाळली पाहिजे, असा टोला लगावला. अखेर अध्यक्षांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत, सभागृहात एक सदस्य बोलत असताना दुसऱ्याने मध्ये बोलू नये, असे स्पष्ट निर्देश दिले.
सिंधुदुर्गातही शालार्थ आयडी घोटाळा?
राज्यात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याचे लोण सिंधुदुर्गात आहे का, याची वस्तुनिष्ठ माहिती पुढील सभेत देण्याची मागणी प्रमोद रावराणे यांनी केली. जिल्ह्यातील शिक्षण विभागात अतिरिक्त शिक्षक भरणे, रोस्टर डावलणे, जात वैधता नसणे अशा ४९ तक्रारींवर ७० लोकांची एसआयटी चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगत, लोकप्रतिनिधींवर आरटीआय टाकून दबाव आणला जात असल्याचा आरोप केला. याशिवाय, नांदोस-रेडी रस्त्यावरील नाबार्डचा दोन कोटींचा पूल वर्षभरातच दुभंगल्याने 'लक्ष्मी कन्स्ट्रक्शन' या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी संदीप गावडे यांनी केली. शेवटी, सभागृहात अध्यक्षांच्या खुर्चीचा आणि पदाचा मान राखलाच गेला पाहिजे, असा मुद्दा संदेश सावंत यांनी मांडला. त्यावर अध्यक्षांचा मान राखण्यासाठी विशेष परिपत्रक काढले जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.