Sindhudurg News : कुडाळ एमआयडीसीतील रस्त्यांसाठी २७ कोटींची मंजुरी

औद्योगिक विकासाला नवी चालना !
Uday Samant |
उद्योगमंत्री उदय सामंत Pudhari File Photo
Published on
Updated on

कुडाळ : कुडाळ - मालवण मतदारसंघातील औद्योगिक विकासाला गती देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत कुडाळ एमआयडीसी परिसरातील रस्त्यांच्या रुंदीकरण व बळकटीकरणासाठी तब्बल २७ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी असो.च्या सत्कार समारंभात दिलेले आश्वासन पूर्ण करत ही मंजुरी दिली आहे. आ. नीलेश राणे यांच्या आग्रही पुढाकारातून ही मंजूरी प्राप्त झाली आहे. कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असो.च्या वतीने या कामासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात येत होता. भरीव निधीची मंजूरी मिळाल्याने या पाठपुराव्याला यश मिळाल्याची माहिती एमआयडीसी इंडस्ट्रीज असो. चे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी दिली. त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत आणि आ. नीलेश राणे यांचे आभार मानले.

श्री.होडावडेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे, कुडाळ औद्योगिक वसाहतीतील वाढत्या उद्योगधंद्यांच्या गरजा लक्षात घेऊन एमआयडीसी जंक्शन ते पिंगुळी म्हापसेकर तिठा, तसेच एमआयडीसी जंक्शन ते नवीन एमआयडीसी मार्गे पाट जंक्शन, आणि अंतर्गत दोन प्रमुख मार्ग अशा सुमारे ७.५ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे रुंदीकरण, काँक्रिटीकरण व बळकटीकरण करण्यात येणार आहे. यापूर्वी असोसिएशनच्या प्रयत्नांमुळे राष्ट्रीय महामार्ग ते एमआयडीसी जंक्शन या मार्गाचे दुपदरीकरण व मजबुतीकरण सुमारे १८ कोटी रुपयांत पूर्ण झाले होते. आता या नव्या टप्प्यामुळे संपूर्ण औद्योगिक परिसरासाठी दर्जेदार व अखंड रस्ते जाळे उभे राहणार आहे.

या कामासाठी आ. नीलेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा करत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे विशेष लक्ष वेधले होते. उद्योगमंत्र्यांनीही याची दखल घेत, संबंधित विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन प्रत्यक्षात उतरवले. या प्रकल्पामुळे कुडाळ एमआयडीसीमधील उद्योगांना मोठा दिलासा मिळणार असून, भविष्यात येणाऱ्या नव्या उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा सक्षम होतील. विशेषतः पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

हा रस्ता विकसित झाल्यामुळे एमआयडीसी ते विमानतळ असा थेट आणि सुलभ कॉरिडोर तयार होणार असून, याचा फायदा उद्योगांसोबतच पर्यटन क्षेत्रालाही होणार आहे. महामार्ग ते विमानतळ असा प्रवास अधिक जलद व सोयीस्कर होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एकूण विकासाला चालना मिळणार आहे. यासोबतच, कुडाळ औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र वीज उपकेंद्राच्या मागणीचाही पाठपुरावा सुरू असून, त्यालाही लवकरच मंजुरी मिळण्याचे सकारात्मक संकेत मिळत आहेत. एकूणच, या निर्णयामुळे कुडाळ एमआयडीसीचा औद्योगिक नकाशावर अधिक भक्कम ठसा उमटणार असून, रोजगारनिर्मिती व स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळणार आहे, असा विश्वास एमआयडीसी इंडस्ट्रीज असो. अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी या महत्त्वपूर्ण मंजुरीबद्दल उद्योगमंत्री उदय सामंत आणि आ. नीलेश राणे यांचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news