

दोडामार्ग; पुढारी वृत्तसेवा : हेवाळे गावात शिमगोत्सवाच्या पाचव्या दिवशी होणारा अनोखा असा वाघखेळ सोमवारी पार झाला. हा खेळ पाहण्यासाठी इतर गावांतील भाविकही मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. कोकणात शिमगोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा केला जातो. काही गावात पाच, काही गावात सात, नऊ तर काही गावात पंधरा दिवसांचा हा शिगमोत्सव असतो. हेवाळे गावात हा उत्सव पाच दिवसांचा असतो.
हेवाळे गावात होळीच्या पाचव्या दिवशी अनोखा असा वाघखेळ खेळला जातो. हा खेळ संपूर्ण तालुका आणि जिल्हावासीयांना कुतूहलाचा विषय असतो. यावर्षी होळीच्या पाचव्या दिवशी सोमवारी सायंकाळी हा खेळ झाला. शिवाय यावेळी घोडेमोडणीचाही कार्यक्रम झाला. यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
गावातीलच एक व्यक्ती वाघासारख्या रंगाचा पेहराव करते. त्यानंतर मंदिर परिसरात हा वाघ दाखल होतो. देवाचा आशिर्वाद घेऊन तो खेळास सुरूवात करतो. खेळ करताना तो मातीची उधळण करतो. या मातीची ज्याच्या डोक्यावर उधळण होईल त्याला ग्रामदेवतेचा आशिर्वाद प्राप्त होतो अशी ग्रामस्थांची श्रद्धा असल्याने तो आशिर्वाद आपल्यास मिळावा यासाठी ग्रामस्थ वाघाकडून मातीची उधळण डोक्यावर करून घेतात.
या खेळामागे एक गोष्ट असल्याची ग्रामस्थ वारंवार सांगत असतात. गावची ग्रामदेवता श्री देव मायगावस हा गावात एकाच तळीवर ‘वाघ’ आणि ‘शेळी’ यांना पाणी पाजायचा. वाघाने कधीही शेळीकडे वक्रदृष्टीने पाहिले नव्हते. म्हणजेच काय तर शत्रूसुद्धा प्रेमाने एकत्र राहू शकतात. ‘मायगावस’ने हा चमत्कार केला आणि तीच आता या गावची ग्रामदेवता बनली. याच प्रेमरूपी एकोप्याने हेवाळेत शिमगोत्सव साजरा होतो आणि वाघाचा खेळ भाविकांना आजही अनुभवयास मिळतो.