

कुडाळ : सिंधुदुर्गात प्रसिद्ध असलेला कुडाळ तालुक्यातील नेरूर सायचे टेंब येथील शिमगोत्सवातील मांड उत्सव शनिवारी रात्री मोठ्या दिमाखात पार पडला. विविध कथासारांवर आधारित एकापेक्षा एक सरस असे, आकर्षक, कल्पक आणि भव्यदिव्य हलत्या ट्रिकसीनयुक्त विविध चित्ररथ देखाव्यांचे लक्षवेधी सादरीकरण करण्यात आले. चलचित्रांसोबतच पारंपरिक वेशभूषेचा साज, विविध सोंगांसह खेळांच्या कलाविष्काराचे अप्रतिम सादरीकरण करीत कलाकारांनी उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.
या मांड उत्सवात विविधांगी कलाविष्काराचे नेत्रदीपक सादरीकरण करण्यात आले. रसिक प्रेक्षकांच्या अफाट गर्दीत पार पडलेला हा मांड उत्सवातील नेत्रदीपक सोहळा लक्षवेधी ठरला. हा विविधांगी नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी सिंधुदुर्गासह महाराष्ट्र व गोवा राज्यातील हजारो रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून कलाकारांच्या कलाविष्काराला उत्स्फूर्त दाद दिली. तळकोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान रोंबाट, राधानृत्य, खेळ आदी पारंपारिक कार्यक्रम गावोगावी होतात. मात्र नेरूर येथील पाच दिवसांचा शिमगोत्सव आणि तिसर्या दिवशी होणारा सायचे टेंब येथील प्रसिद्ध मांड उत्सवहा एक आगळावेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण शिमगोत्सव आहे. होळीच्या तिसर्या दिवशी श्री गावडोबा मंदिर येथून गावडे समाजाचे श्री देव कलेश्वराच्या भेटीला येणारे गोडे रोंबाट व त्यानंतर या रोंबाटाच्या परतीच्या वाटेवर नेरूर सायचे टेंब येथे होणारामांडउत्सव हा कार्यक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेतो.
यंदाही शिमगोत्सवाच्या तिसर्या दिवशी शनिवारी रात्री रसिक प्रेक्षकांच्या अफाट गर्दीत हा मांड उत्सव पार पडला. सुरूवातीला मांड उत्सव ठिकाणी नवस फेडणे, नवस बोलणे कार्यक्रम झाले. त्यानंतर भव्यदिव्य ट्रिकसीनयुक्त देखाव्यांसह कलाविष्काराचे सादरीकरण करण्यात आले. आना मेस्त्री ग्रुप, विलास मेस्त्री ग्रुप, बाबा मेस्त्री ग्रुप आणि दिनू मेस्त्री ग्रुप यांनी पौराणिक कथासारावर आधारित एकापेक्षा एक सरस असे मोठमोठे आकर्षक, कल्पक असे हालत्या ट्रिकसीनयुक्त चित्ररथ देखाव्यांचे सादरीकरण केले.सोबतीला समर्पक संगीत साथीवर एकापेक्षा एक सरस अभंगांच्या तालावर या सर्वच कलाकारांनी ताला - सुरात लेझीमच्या तालावर नाचत, कलाविष्कार सादर केला. निवेदन राजा सामंत व नीलेश गुरव यांनी केले. हा सोहळा पाहण्यासाठी सिंधुदुर्गासह, रत्नागिरी, पुणे, मुंबई, गोवा, बेळगाव व अन्य भागातील रसिक प्रेक्षकांनी गर्दी केली होती. कार्यक्रम संयोजक तसेच नेरूर देऊळवाडा ग्रा.पं.ने या कार्यक्रमासाठी चांगले नियोजन केले होते.