

मळगाव : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचे 10 नोव्हेंबरपर्यंत असलेले पावसाळी हंगामी वेळापत्रकात सुधारणा करून आता कोकण रेल्वेने 20 ऑक्टोबरपर्यंत सुधारित वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यामुळे 21 ऑक्टोबरपासून कोकण रेल्वे मार्गावर नियमित वेळापत्रकानुसार रेल्वे गाड्या धावणार आहेत.
कोकण रेल्वे मार्गावर वाढती प्रवासी संख्या पाहून कोकण रेल्वे प्रशासनाने यावर्षीपासून रेल्वे गाड्यांचे काटेकोरपणे नियोजन केले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास समाधानकारक होत असल्याचे चित्र आहे. दरवर्षी पावसाळी हंगामात निश्चित वेळापत्रकात यावर्षी कोकण रेल्वेने बदल करून 20 दिवस कमी केले आहे. कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचे पावसाळी हंगामासाठी निश्चित केलेले कोकण रेल्वेचे वेळापत्रक 20 ऑक्टोबरला संपणार आहे.
त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक 21 ऑक्टोबरपासून नियमित करण्यात आले आहे. दिवाळीसाठी कोकणातून मुंबईला जाणाऱ्या व मुंबईतून कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वेचा प्रवास 21 ऑक्टोबरपासून वेगवान होणार आहे.दरवर्षी पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे डोंगरदऱ्यातून जाणाऱ्या रेल्वेला या दरडींचा धोका असतो. तसेच कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गावरील दृश्यमानता कमी होते.
या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात सतर्कता म्हणून कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे लागते. पावसाळ्यातील नैसर्गिक धोका टाळण्यासाठी कोकण रेल्वेच्या एकूण 739 कि.मी. मार्गापैकी वीर-उडुपी दरम्यान 646 किमी. लांबीच्या मार्गावर वेगमर्यादा लागू करण्यात आली. पावसाळ्यात रेल्वे गाड्यांचा वेग कमी केल्यामुळे रेल्वेगाड्या धीम्या गतीने धावतात. तर इतर भागात रेल्वेला सामान्य वेगमर्यादा लागू असते.कोकण रेल्वे मार्गावर सुरक्षितता राखण्यासाठी दरवर्षी 10 जून ते 10 नोव्हेंबर दरम्यान कोकण रेल्वेवर पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येते. मात्र यावर्षी कोकण रेल्वेने रेल्वे मार्गावरील नियोजनबद्ध पूर्व पावसाळी कामे केल्याने व इतर पायाभूत कामे पूर्ण झाल्याने कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकात सुधारणा केली. 10 जून ऐवजी 15 जूनपासून तर 10 नोव्हेंबर ऐवजी 20 ऑक्टोबरपर्यंतच पावसाळी वेळापत्रकाचे नियोजन केले. त्यामुळे 21 ऑक्टोबरपासून नियमित वेळापत्रक लागू केले जाणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सीएसएमटी-मंगळूरु जंक्शन, सीएसएमटी- मडगाव जंक्शन कोकणकन्या एक्स्प्रेस, एलटीटी करमळी एक्स्प्रेस, दादर टर्मिनस-सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस, सीएसएमटी मडगाव जंक्शन वंदे भारत एक्स्प्रेस, सीएसएमटी मडगाव जंक्शन जनशताब्दी एक्स्प्रेस, सीएसएमटी - मडगाव जंक्शन तेजस एक्स्प्रेस यांसह अनेक रेल्वेगाड्यांचा वेग आता वाढणार असून प्रवास काही तासांनी कमी होणार आहे.