

सावंतवाडी : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या समस्या आणि दुर्लक्षणाची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. बुधवारी मुंबईतून सुटणारी दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला चक्क एक आरक्षित कोच (DL) न जोडताच मार्गस्थ झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. परिणामी या डब्याचे आरक्षण केलेल्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
रेल्वेच्या या गंभीर त्रुटीमुळे तिकीट काढूनही प्रवाशांना त्यांच्या सीटवर बसता आले नाही. संतप्त प्रवाशांनी तिकीट तपासणीसांकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी हात वर करत रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करण्याची सूचना केली.
या संपूर्ण गोंधळानंतर रेल्वे मंत्रालय व कोकण रेल्वेकडून केवळ माफी मागून या प्रकारावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. इतर विभागांमध्ये अशी गंभीर चूक झाली असती तर? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.
या अक्षम्य चुकीमुळे कोकणवासीयांमध्य तीव्र संतापाची लाट उसळली आहे. रेल्वे प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी आता ‘रेलरोको’ हा एकमेव पर्याय आहे, असे मत संतप्त प्रवासी संघटनांकडून व्यक्त होत आहे.