Konkan Dashavatar | कोकणचा ‘दशावतार’ आता रूपेरी पडद्यावर

कळसुलीचे सुपुत्र संजय लाड यांच्यासह दशावतारी कलावंतांचा सहभाग
Konkan Dashavatar
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या समवेत संजय लाड व स्त्री पात्र भूमिकेत संजय लाड.(Pudhari File Photo)
Published on
Updated on

कणकवली : कोकणच्या लोककलेचे आणि संस्कृतीचे प्रतीक असलेला ‘दशावतार’ आता मराठी चित्रपटाच्यारूपाने रुपेरी पडद्यावर साकारणार आहे. या माध्यमातून दशावतार आता जगभर पोहोचणार आहे. कुडाळ तालुक्यातील वालावल, वेतोरे, केळूस, धामापूर, सरमळ अशा ठिकठिकाणी निसर्गरम्य परिसरात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले असून ज्येष्ठ सिनेअभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव यांच्यासारखे दिग्गज अभिनेते यामध्ये आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात कळसुलीचे सुपूत्र आणि दशावतारमध्ये स्त्री पात्र भुमिका करणारे गोविंद उर्फ संजय लाड यांच्यासह काही दशावतारी कलावंतांना काम करण्याची संधी यामध्ये मिळाली आहे.

गेल्या 25 वर्षाहून अधिक काळ दशावतार या लोककलेची सेवा करताना ‘दशावतार’ याच नावाने चित्रीत झालेल्या या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली हा आमच्या कलेचा गौरवच असल्याची प्रतिक्रिया संजय लाड यांनी दिली. शेकडो वर्षांपासून चालत आलेली दशावतार ही कोकणची लोककला इथल्या दशावतारी कलावंतांनी आणि कोकणातील जनतेने तेवढ्याच आत्मियतेने जपली आहे. एकेकाळी केवळ वार्षिक जत्रोत्सवांपुरती मर्यादीत असलेली ही लोककला आता कोकणच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनली आहे.

Konkan Dashavatar
Kankavali Tree Plantation | पत्रकार संघाचा वृक्ष लागवडीचा उपक्रम स्तुत्य : उमेश तोरस्कर

विशेष म्हणजे युवा पिढीतील नवनवीन कलावंतही या कलेच्या माध्यमातून उदयास येत आहेत. सुबोध खानोलकर निर्मित आणि दिग्दर्शीत दशावतार या चित्रपटाच्या माध्यमातून दशावताराचे अंतरंग उलगडणार आहेत. या चित्रपटात इतर कलावंतांबरोबरच दशावतारी कलावंत म्हणून दशावतारात प्रत्यक्ष काम करणार्‍या कलाकारांना संधी देण्यात आली आहे. ज्येष्ठ दशावतारी कलावंत आणि सध्या कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर या मंडळात स्त्री पात्र कलाकार म्हणून काम करणारे संजय लाड यांच्यासह संतोष रेडकर, दादा राणे-कोनस्कर, यश जळवी, गोपाळ तेरेखोलकर, ज्ञानेश्वर तांडेल हे दशावतारी कलावंत या चित्रपटात आहेत. शिवाय अन्यही स्थानिक कलाकारांना काम करण्याची संधी देण्यात आली आहे. दशावतार नाटकात प्रत्यक्ष काम करणे आणि दशावतार चित्रपटात काम करणे हा अनुभव खरोखरच वेगळा होता. दिग्गज अभिनेत्यांचे मार्गदर्शन आणि सहवास यानिमित्ताने आम्हाला मिळाल्याचे संजय लाड सांगतात.

Konkan Dashavatar
Kankavali Tree Plantation | पत्रकार संघाचा वृक्ष लागवडीचा उपक्रम स्तुत्य : उमेश तोरस्कर

संजय लाड यांना यापूर्वी दशावतारी कलेसाठी ठाणे गौरव पुरस्कार, कोकण कला अकादमी गोवा पुरस्कार तसेच कामगार कल्याणचेही विविध पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. आपले गुरू स्व.बी.के. तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दशावतारी कलेचे धडे घेवून त्यांच्याच भालचंद्र दशावतारी नाट्य मंडळातून आपली सुरूवात झाली. गेल्या 25 वर्षात वालावलकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, मामा मोचेमांडकर दशावतार नाट्य मंडळ या सारख्या मंडळांमध्ये आपण काम केले आहे. निश्चितच दशावतार नावाच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याने एक वेगळेच समाधान आपल्याला मिळाल्याचे श्री. लाड यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news