

नांदगाव : दरवर्षी नागपंचमी दिवशी दुपारनंतर कोळोशी येथील श्री पावणादेवी मंदिर प्रांगणात रंगणारा ‘ भल्ली भल्ली भावय..’चा खेळ या वर्षीही नागपंचमी दिवशी मंगळवारी पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात खेळण्यात आला. चिखल, माती, पाणी एकमेकांवर उडवण्याची मजा लुटत या खेळात गावातील आबालवृद्धांनी मनसोक्त आनंद लुटला. हा आगळावेगळा खेळ पाहण्यासाठी स्थानिकांसह परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
‘भल्ली....भल्ली....भावय.....’ या उत्सवाला कोकणात धार्मिक महत्त्व आहेे. कोळोशी गावातील श्री पावणादेवी मंदिराच्या प्रांगणात दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी हा कौशल्य पणाला लावणारा खेळ खेळला जातो. ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी ग्रामदैवत श्री गांगेश्वर मंदिरात पूजा केली व या धार्मिक खेळाचा पुढील विधी पूर्ण करण्यासाठी देवाकडून परवानगी घेतली. त्यानंतर मंदिरात भोजन झाल्यानंतर दुपारनंतर देव तरंग आपल्या लवाजम्यासहित पावणादेवी मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झाले.तरंग पावणादेवी मंदिरात पोहचल्यावर याठिकाणी देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. यासाठी माहेरवाशीनींसह परीसरातील महिलांनी मोठी गर्दी केली होती.
त्यानंतर ढोल -ताशांच्या गजरात भल्लीभल्ली भावय हा पारंपरिक खेळाला सुरवात झाली. एका हातात आंब्याचा टाळ आणि एका हातात लाकडी खुंटी घेवून चिखलात बसून ढोल ताशांच्या गजरात भल्ली भल्ली भावयचा गजर करत हा खेळ खेळण्यास सुरवात झालीे. स्वतःला व खेळणार्या इतरांना चिखल लावत अंगावर पाणी ओतत हा खेळ अधिकच रंगत आला. यावेळी तरूण व वरिष्ठ मंडळी भल्ली भल्ली भावयचा जयघोष करीत एकमेकांना साद घालत होते. ‘भावय’ संपल्यानंतर सर्वजण वनराईतील पाषाणातील पाणी अंगाला लावून तळीमध्ये आंघोळीचा आनंद सर्वांनी घेतला. हा ‘भावय’चा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांसह महिलांनी एकच गर्दी केली होती.
यात शेवटी कौशल्य पणाला लावणारा ‘सापड’ खेळ दोघांमध्ये खेळला जातो. यात एकजन उलटी मांडी घालून जमिनीवर डोके हात विशीष्ट पध्दतीने ठेवून जमिन धरतो. त्यावेळी दुसरा त्याच पद्धतीने आपल्या खांद्याच्या सहाय्याने त्याला जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये कौशल्य पणाला लागतेे. खेळाच्या शेवटी एकजण अंगात आल्याचे सोंग घेतो.तर एकाला डुक्कर मानून चौघेजण त्याचे हातपाय पकडून ‘हर हर महादेव’ अशी गर्जना करीत त्याला मंदिराभोवती फिरवतात.