

कणकवली ः कोल्हापूर-राजारामपुरी येथील विक्रांत सुरेश चव्हाण (22) हे सावंतवाडी मंगळवारच्या आठवडा बाजारात कपडे विक्रीसाठी मित्रासमवेत कोल्हापूर ते सावंतवाडी दुचाकीने जात असताना मुंबई-गोवा महामार्गावर हुंबरट पुलावर त्यांच्या दुचाकीला अचानक आग लागली आणि काही वेळातच दुचाकी आणि दुचाकीवरील कपडे जळून खाक झाले. ही घटना सोमवारी दुपारी 1.30 वा. च्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दुचाकीचे 80 हजाराचे, कपड्यांचे 25 हजाराचे, गाडी परवाना, एटीएम आणि 4 हजार 500 रुपये रोकड असे मिळून 1 लाख 9 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले.
कोल्हापूर येथील विक्रांत चव्हाण यांचा महालक्ष्मी मंदिरनजिक कपडे विकण्याचा स्टॉल आहे. सोमवारी व मित्र आकाश लालवानी दुचाकीवर पुढे कपड्यांचे पार्सल ठेवून कोल्हापूर ते सावंतवाडी निघाले होते. दुपारी 1.30 वा. च्या सुमारास ते हुंबरट उड्डाणपुलावर आले असता दुचाकीच्या मागील बाजुने धूर येवू लागला म्हणून त्यांनी दुचाकी थांबवली असता पूर्ण दुचाकीने पेट घेतला. विक्रांत यांनी पाण्याच्या बाटलीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकी पूर्णपणे जळून गेली. यामध्ये दुचाकीसह दुचाकीवरील कपडे आणि बॅग जळून गेली. यात दुचाकी, कपडे आणि रोख रकमेसह 1 लाख 9 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले. याबाबतची खबर विक्रांत चव्हाण यांनी कणकवली पोलिसात दिली. दुचाकीला नेमकी आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही.