

सावंतवाडी ः भाजप सरचिटणीस महेश सारंग यांच्या डोक्यात हवा गेली आहे, ‘मात्र बाप तो बाप ही होता है’. हे त्यांनी लक्षात ठेवावे. आम्हाला सल्ले देण्याअगोदर आधी तुमचा गाव सांभाळा आणि नंतर मतदारसंघाच्या बाता करा, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांना दिले. आ.दीपक केसरकर हे आमचे नेते आहेत. त्यांचा शब्द आम्हांला प्रमाण आहे. त्यामुळे भाजपच्या मंडळींचा शिवसेनेमध्ये प्रवेश घेणार नाही. परंतु श्री. सारंग यांनी आव्हान दिल्याने त्यांच्या मतदारसंघातील चौघांना मी आज सोबत घेतले आहे. आठ दिवस नव्हे तर अवघ्या 48 तासात त्यांचे आव्हान मी पूर्ण केले, असा दावा श्री.परब यांनी केला,
श्री. सारंग यांनी शिवसेना जिल्हाप्रमूख संजू परब यांना ‘भाजपचे कार्यकर्ते घ्यायचेच असतील तर आठ दिवसात घ्या. आम्ही पक्ष शून्यातून पुन्हा उभा करू’ असे आव्हान दिले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमूख संजू परब यांनी महेश सारंग यांचे गाव असलेल्या कोलगाव ग्रामपंचायतीचे चार विद्यमान सदस्य पत्रकार परिषदेत सोबत घेत श्री. सारंग यांना प्रति इशारा दिला. श्री.परब म्हणाले, कोलगाव ग्रामपंचायत सदस्य रोहीत नाईक, प्रणाली टिळवे, संयोगिता उगवेकर आणि आशिका सावंत हे चार विद्यमान सदस्य आज माझ्या सोबत आहेत. त्यांच्यासह अजून एक सदस्य शिवसेनेत येण्यास इच्छूक आहेत. मात्र शिवसेनेचे नेते आ. दीपक केसरकर यांनी मित्र भाजपचे कार्यकर्त्यांचे शिवसेनेत प्रवेश घेवू नका, असे बजावल्याने आपण गप्प असल्याचे त्यांनी सांगितले.
महेश सारंग यांचा उल्लेख ‘माझे मित्र’ असे करीत संजू परब यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. ज्यांना आपला स्वतःचे गाव सांभाळता येत नाही, त्यांनी विधानसभा मतदारसंघांच्या गोष्टी करु नयेत. खरेतर सारंग यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांना उत्तर द्यायचे नव्हते, परंतु कार्यकर्त्यांनी सांगितल्यामुळे मी बोलत आहे. श्री. सारंग यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या चौघांचा प्रवेश मी आत्ताही शिवसेनेत घेवू शकतो. परंतु आ. दीपक केसरकर यांच्या आदेशामुळे मी गप्प आहे. मात्र या सदस्यांना सोबत घेऊन श्री. सारंग यांच्या आव्हानातील ‘हवा’ काढल्याचा दावा त्यांनी केला. ‘आखीर बाप तो बाप होता है, बॉस ईज ऑलवेज राईट’ असा उपरोधिक टोला त्यांनी महेश सारंग यांना लगावला.
संजू परब म्हणाले, आम्ही ठरवले, तर शिवसेनेत रोज प्रवेश होतील. पण महायुतीच्या नेत्यांचा मान राखून आम्ही असे प्रवेश टाळत आहोत. त्यामुळे आमच्या नादाला लागण्याचा कोणी प्रयत्न करू नये. आम्ही ठरवले तर कधीही काहीही करू शकतो, त्यामुळे आम्हांला कोणी आव्हान देऊ नये. यापुढे कोणत्याही नेत्याचा फोन आला तरी आपण गप्प बसणार नाही, असा जाहीर इशारा श्री. परब यांनी दिला. कोलगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान चार सदस्य आपल्यासोबत असून केवळ महायुतीचा मान राखण्यासाठीच आम्ही त्यांचा प्रवेश थांबवला असल्याचे परब यांनी पुन्हा स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेत कोलगाव ग्रामपंचायतच्या सदस्यांनी भारतीय जनता पार्टीच्या एकाधिकारशाहीला कंटाळून भाजप सोडली असल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. एकाधिकारशाहीबरोबर सत्ता असूनही विकास कामे होत नाहीत त्यामुळे शिवसेनेसोबत विशेषतः जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या प्रभागामधील विकास कामे शिवसेना निश्चितपणे करेल, असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.