

खारेपाटण : खारेपाटण- बंदरवाडी येथील विनायक धोंडू पिसे यांच्या राहत्या दुमजली घराला आग लागून लाखोचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी सकाळी 10.30 वा. च्या सुमारास घडली. सुदैवाने घरामध्ये राहणार्या व्यक्तींना कोणतीही दुखापत झाली नाही, परंतु घरातील फर्निचर व इतर साहित्य सहित संपूर्ण छप्पर जळाल्याने मोठे नुकसान झाले. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
खारेपाटण- बंदरवाडी मधील विनायक पिसे यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर कोणीही नसल्याने लागलेली आग सुरूवातीला लक्षात आली नाही, परंतु काही वेळाने घराच्या छप्परामधून धुराचे लोट निघू लागल्याने बाजूला काम करणार्या महिलांनी ही आग निदर्शनास आणून दिली. आग लागल्याचे लक्षात येताच बंदरवाडीतील सामाजिक कार्यकर्ते गौरव ढेकणे यांनी स्थानिकांसह घटनास्थळी धाव घेतली.
रवींद्र चव्हाण, संतोष चव्हाण, अवधूत ढेकणे, आदित्य पिसे, रमेश ढेकणे, सोमेश्वर पिसे यांनी तात्काळ धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. यामुळे पुढील अनर्थ टळला. तरीही आगीमध्ये घरच छप्पर, फर्निचर, टीव्ही, कपाट, कपडे, पलंग व घरातील इतर साहित्य जळून खाक झाले.
घराला आग लागल्या नंतर या ठिकाणी अग्निशामक बंब पोहोचण्याची सुविधा नसल्याने स्थानिकांनी प्रसंगावधानाने बागेतील पाण्याच्या पंपाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच महसूल मंडळ अधिकारी सरिता बावलेकर, ग्राम महसूल अधिकारी कृष्णा लूडबे आणि महसूल सेवक प्रथमेश गुरसाळे यांनी स्थानिक रहिवासी योगेश गोडवे व नंदकिशोर कोरगावकर यांच्या सहकार्याने पंच यादी करून प्रशासकीय दरबारी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.