

वैभववाडी : करूळ घाटातील अवघड वळणात चालकाला दाट धुक्याचा अंदाज न आल्याने आयशर टेम्पो करुळ घाटात पलटी होऊन अपघात झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून ट्रक संरक्षक कटड्याला अडकून खोल दरीत कोसळण्यापासून थोडक्यात वाचला. अपघातात चालक आणि क्लीनर बालंबाल बचावले आहेत. दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी रात्री 9 वा.झाला.
बुधवारी करूळ घाटात दाट धुके पडले होते. या दरम्यान कोल्हापूरहून सावंतवाडीकडे सिमेंटचे पत्रे भरलेला आयशर टेम्पो घेऊन चालक अभिजीत कांबळे जात होते. करूळ घाटात गगनबावड्यापासून चार किमी. अंतरावर धोकादायक वळणावर दाट धुक्याचा चालकाला अंदाज आला नाही. त्याने ब्रेक मारताच टेम्पो पलटी झाला.
सदर टेम्पो हा गॅबियन भिंतीवर जोरदार आढळला. भिंतीचा काही भाग दरीत कोसळला व सिमेंटचे पत्रे देखील दरीत पडले. टेम्पोचा काही भाग भिंतीच्या पुढे झुकला. अपघातग्रस्त टेम्पोतून चालक क्लीनर मोठ्या शिताफीने बाहेर पडले. चालक किरकोळ जखमी झाला आहे. त्याच्यावर गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच करूळ चेक नाक्यावर ड्युटीवर असलेले पोलिस व करूळ पोलिस पाटील उदय कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. घाटात काम करीत असलेल्या वेल्हाळ कंपनीच्या कामगारांनी चालक, क्लीनर यांना मदत केली.