

फोंडाघाट : हुंबरट-फोंडाघाट राज्यमार्गावरील करूळ बसथांबा परिसर अपघातांसाठी ‘ब्लॅक स्पॉट’ ठरत आहे. महिन्याभरात या परिसरात सात ते आठ अपघात झाले आहेत. शनिवारीही याच ठिकाणी कोल्हापूरकडे जाणारा एक कंटेनर रस्त्याच्या साईडपट्टीवर खाली उतरला. स्लीप होऊन रस्त्यावरच आडव्यास्थितीत उभा राहिला. या दरम्यान तेथून जाणारा एक दुचाकीस्वार केवळ प्रसंगावधनामुळे ट्रकच्या धडकेपासून बचावला, मात्र त्याची दुचाकी लगतच्या गटात पडून गाडीचे नुकसान झाले.
कंटेनर भरधाव वेगात जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व हा कंटेनर साईडपट्टीवर उतरला. मात्र कंटेनर वेगात असल्याने तो मातीत स्लिप होऊन रस्त्याच्या मधोमध आडव्यास्थितीत उभा राहिला. सुदैव म्हणून कंटेनर पलटी होण्यापासून वाचला. कंटेनर संपूर्ण रस्त्यावर आडवा असल्याने मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. करूळ एसटी बसथांबा येथे ही घटना घडली. याच वेळी एक दुचाकीस्वार समोरून येत होता. त्याने अनियंत्रित कंटेनर पाहून प्रसंगावधान राखत दुचाकी रस्त्याबाहेर घेतली, मात्र या प्रयत्नात त्याची दुचाकी थेट गटारात कोसळली. यात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला, मात्र दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
कंटेनर अनियंत्रीत झाला, त्याच ठिकाणी प्राथमिक शाळा व जवळच हायस्कूल आहे. यामुळे बसथांब्यावर विदद्यार्थ्यांची गर्दी असते. मात्र, शनिवार असल्याने शाळा सकाळच्या सत्रात सुटली होती. अन्यथा. शाळेच्या मुलांनी गजबजलेल्या या स्टॉपवरती एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता होती. या मार्गाचे दुरूस्ती काम निकृष्ट झाल्याने येथे वारंवार अपघात होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.कंटेनर अनियंत्रीत झाला, त्याच ठिकाणी प्राथमिक शाळा व जवळच हायस्कूल आहे. यामुळे बसथांब्यावर विदद्यार्थ्यांची गर्दी असते. मात्र, शनिवार असल्याने शाळा सकाळच्या सत्रात सुटली होती. अन्यथा. शाळेच्या मुलांनी गजबजलेल्या या स्टॉपवरती एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता होती. या मार्गाचे दुरूस्ती काम निकृष्ट झाल्याने येथे वारंवार अपघात होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गेल्या महिनाभरत याच ठिकाणी झालेला हा सहावा ते सातवा अपघात आहे. त्यामुळे करूळ गावातील हा भाग अपघातांसाठी ‘ब्लॅक स्पॉट’ ठरत आहे. वाहनांचा अतीवेग, अडगळलेली साईडपट्टी तसेच सूचना फलकांच्या अभावा आदी कारणे या अपघातांना पूरक ठरत आहेत. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच सा. बां. विभाग येथे उपाययोजना करणार काय? असा सवाल ग्रामस्थ व वाहन चालकांमधून केला जात आहे.