

करूळ घाटातील संपूर्ण रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले असून संपूर्ण रस्ता रुंदीकरण करून काँक्रिटीचा करण्यात आला आहे. तर संपूर्ण घाटात संरक्षक भिंती, आधार भिंती, क्रॅश बॅरियर, नवीन गटारे, पाच ठिकाणी दरडीवर संरक्षक जाळी बसविण्यात येत आहे. त्यामुळ कित्येक वर्षानंतर प्रथमच घाट रस्ता सुरक्षीत व सुपरफास्ट झाला आहे.
पावसाळ्यात कोसळणार्या दरडींचा धोका मात्र कायम आहे. तब्बल 28 ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे घाटमार्गात बांधण्यात आलेली गटारे व संरक्षक भिंती, आधार भिंती यांच्या दर्जाची पावसाळ्यात खर्या अर्थाने ‘लिटमस टेस्ट’ होणार आहे.
करूळ घाट व भुईबावडा घाटमार्ग तत्कालीन आमदार कै. ए. पी. सावंत यांच्या प्रयत्नाने तत्कालीन बांधकाममंत्री बाळासाहेब देसाई यांच्या काळात गगनबावड्यातून तळकोकणात जाण्यासाठी हे दोन घाटमार्ग फोडण्यासाठी 15 नोव्हेंबर 1958 साली सुरुवात झाली. सन1965 पासून या घाटातून वाहतूक सुरू करण्यात आली.
दिवसेंदिवस ही वाहतूक वाढत जाऊन हा घाटमार्ग कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा महत्त्वाचा घाट मार्ग बनला. मात्र गेल्या काही वर्षात घाटमार्गाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे घाट मार्गाची दुरावस्था झाली होती. त्यामुळे या दोन्ही घाटमार्गाच्या दुरुस्तीची मागणी सातत्याने करण्यात येत होती. अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या घाटमार्गासह 21 किमी. लांबीच्या रस्त्यासाठी 110 कोटी रुपये मंजूर केले.
करूळ घाटातील कामासाठी 22 जानेवारी 2024 पासून घाट मार्गातीलवाहतूक पूर्णपणे बंद करून संपूर्ण घाटाचे नूतनीकरणाचे काम करण्यात आले. यामध्ये सुमारे 11 किलोमीटर घाट रस्त्याचे काँक्रिटीकरण तसेच घाटमार्गातील सुमारे 65 मोर्या तसेच 4.5 किलोमीटर लांबीच्या संरक्षण भिंती तर 4.5 किलोमीटर लांबीचे कॅश बॅरिअर तसेच संपूर्ण घाटात गटर लाईन करण्यात आले आहे. तब्बल 14 महिने घाटातील वाहतूक बंद ठेवून हे संपूर्ण कामे करण्यात आले आहे.
काम सुरू असताना गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीत नवीन केलेले संरक्षण भिंतीचे काम रस्त्यासह वाहून गेल्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यानंतर घाटातील उर्वरित कामे पूर्ण करण्यात आले आहेत. घाटातील संपूर्ण रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले असून सुमारे 7 मीटर रुंदीचा रस्ता करण्यात आला आहे. त्यामुळे घाटातील रस्ता सुपरफास्ट झाला आहे. मात्र पावसाळ्यात कोसळणार्या दरडींचा धोका कायम आहे. तब्बल 28 ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका आहे. यापैकी पाच ठिकाणी संरक्षक जाळी बसवण्यात येत आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे.
संपूर्ण घाटमार्गात काँक्रीट गटर बांधण्यात आले आहेत. मात्र ही गटार बांधताना असताना दरडीपासून काही अंतरावर पुढे बांधल्यामुळे डोंगरातून येणारे पाणी या गटारात न येता रस्त्याच्या आतमध्ये मुरून भविष्यात रस्त्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तसेच काही ठिकाणी बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंती यापूर्वीच्या बांधण्यात आलेल्या दगडाच्या संरक्षक भिंतीवरच बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात या काळ्या दगडाची भिंत ढासळल्यास त्याबरोबर नवीन बांधलेली संरक्षण भिंत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. संपूर्ण घाटात रस्त्याच्या साईडने पांढरे पट्टे व रेडीयम तसेच दिशा दर्शक फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात घाटात पडत असलेल्या दाट धुक्यात वाहचालकांना रस्त्याचा अंदाज येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वाहनचाकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
करूळ व भुईबावडा घाटात नेहमी पर्यटक येत असतात. या पर्यटकांना सह्याद्रीच्या दरीखोर्याचा आनंद लुटण्यासाठी, सूर्यास्त दर्शन घेण्यासाठी घाटमार्गात तीन ठिकाणी पर्यटन पॉईंट विकसित करण्यात येणार असून त्यासाठी स्वतंत्र निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी ही समाधानाची बाब आहे.
या घाटमार्गाची पुढच्या दहा वर्षांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही संबंधित काम करणार्या कंपनीची असून घाटमार्गात पावसाळ्यात कोसळणार्या दरडी व आपत्कालीन परिस्थितीत काम करण्यासाठी 24 तास यंत्रणा कार्यरत असणार असून जेसीबी, ट्रॅक्टर, मजूर तैनात ठेवण्यात येतील, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.