Swachh Bharat Mission | स्वच्छ, सुंदर अभियानात कणकवली बसस्थानक पिछाडीवर
कणकवली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान स्पर्धात्मक स्वरुपात राबविण्यात येत आहे. अभियान अंतर्गत बसस्थानकांचे मुल्यमापन चार टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचा निकाल जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये कणकवली बसस्थानक पिछाडीवर असून केवळ 50 टक्के गुण प्राप्त झाले आहे. अभियानासाठी बसस्थानकाचा परिसर स्वच्छ करण्यात आला असला तरी उपहारगृहाच्या मागील बाजूस सांडपाणी उघड्यावरच सोडण्यात आल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व अमरावती अशा सहा प्रादेशिक स्तरावर अ,ब,क अशा तीन गटांमध्ये हि स्पर्धा होणार आहे. कणकवली बसस्थानकाच्या अखत्यारित कणकवली, फोंडा, तळेरे, खारेपाटण व वैभववाडी अशी पाच बसस्थानके येतात. त्यातील कणकवली व तळेरे बसस्थानक ब गटात तर वैभववाडी, खारेपाटण, फोंडा हि बसस्थानके क गटात आहेत. एकट्या कणकवली बसस्थानकातून दररोज सुमारे 16 हजार तर एकूण पाचही बसस्थानकांवरुन सुमारे 25 हजार प्रवासी प्रवास करत असतात.
अभियानामध्ये बसस्थानक व प्रसाधनगृहांची सखोल स्वच्छता यासाठी 30 गुण, बसस्थानक व्यवस्थापनसाठी 30 गुण, कर्मचारी स्वच्छता 4 गुण, वाणिज्या आस्थापनासाठी 10 गुण, खाजगी वाहनांना बंदी-पार्किंग 6 गुण, बागबगीच्या 10 गुण तर हरित परिसरसाठी 10 गुण अशी 100 गुणांची ती परिक्षा आहे. यातील पहिल्या टप्प्याचा निकाल जाहिर झाला असून त्यामध्ये कणकवली बसस्थानकाला सुमारे 50 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. अद्यापही गुणपत्रिका प्राप्त झालेली नाही, असे आगार प्रमुख अजय गायकवाड यांनी सांगितले.
सिंधुदुर्गात कणकवली हे मध्यवर्ती बसस्थानक असून स्थानिक प्रवाशांबरोबरच जिल्ह्याच्या तसेच राज्याच्या विविध भागात जाणार्या प्रवाशांची वर्दळ बसस्थानकांची नेहमीच असते. अभियानातील गुणपत्रिकेचा विचार करता त्यादिशेने कणकवली बसस्थानकावर मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र यामध्ये बसस्थानकाची असलेली जूनी इमारत हे अडचणीचे कारण ठरत आहे. त्याचबरोबर प्रवाशांकडूनही स्वच्छता विषयक पुरेसे सहकार्य मिळत नसल्याचे बसस्थानक प्रशासनाकडून सांगण्यात आले. बसस्थानक परिसराची रंगरंगोटी, कचराकुंड्या, फुलझाडांच्या कुंड्या, गवताची छाटणी आदी कामे करुन परिसर स्वच्छ सुंदर करण्यात आला असला तरी तो परिक्षण समितीच्या पाहणी पुरता असून चालणार नाही तर तो कायम स्वरुपी असणे आवश्यक आहे.
मुंबई-गोवा महामार्गाला बसस्थानक लागूनच असल्याने एसटी गाड्यांसह अनेक खाजगी गाड्याही आवारात ये-जा करताना दिसतात. बसस्थानकाच्या प्रवेशाद्वारावरच खड्डे पडले असून तेथून पुढे उपहारगृहाच्या मागील बाजूस उघड्यावरच गटार तुंबल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे. बसस्थानक परिसराचे काँक्रिटकरण झाले असले तरी मोकळ्या जागेत वृक्षारोपण, छोटी बाग निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर खाजगी दुचाकी वाहनांच्या पार्किंग शेडचीही दुरवस्था झाली असून त्याचेही दुरुस्ती करणे गरजेचे आहे. परिवहन मंत्र्यांनी जाहीर केलेल्या नवीन इमारतीमध्ये कणकवली बसस्थानकाचा समावेश आहे. त्यामुळे येत्या काळात नवीन इमारत मिळणार आहे. अभियानातील दुसर्या टप्प्याचे मूल्यमापन नुकतेच समितीकडून करण्यात आले आहे. या टप्प्यात आपले बसस्थानक सुमारे 75 टक्के गुणांपर्यंत पोचेल असा विश्वास आगार प्रमूख अजय गायकवाड यांनी सांगितले. मात्र तरीही सध्याच्या बसस्थानकावर स्वच्छता विषयक उपाययोजनांवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
कुंडीतील रोपे सुकुन गेली
अभियानाअंतर्गत बसस्थानक परिसरात फुलझाडे व शोभवंत झाडांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यातील काही कुंड्या चोरीस गेल्या तर काही कुंडीतील रोपे सुकुन गेली. हि रोपे प्रवाशांनी गुटखा खाऊन कुंडीत थुंकल्याने मेल्याचे कर्मचार्यांनी सांगितले. यावर उपाय म्हणून तुळशीची रोपे लावली होती. तीही रोपे उपटून नेण्यात आली. त्यामुळे स्वच्छता विषयक उपाययोजनांना प्रवाशांकडूनही सहकार्य अपेक्षित असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.

