

कणकवली : कळसुली- गडगेवाडी येथील रहिवासी विनायक भिकाजी दळवी यांच्या घरात मंगळवारी दुपारी 12 वा. ते 1.15 वा. च्या सुमारास दिवसाढवळ्या धाडसी घरफोडी झाली. यामध्ये चोरट्यांनी सुमारे 20 तोळे सोन्याचे दागिने, 11 तोळे चांदी आणि सव्वा दोन लाखाची रोकड असा सुमारे साडेबावीस लाखाचा मुद्देमाल चोरून नेला. दळवी कुटुंंबिय भातकापणीसाठी शेतात गेले असताना चोरट्यांनी ही धाडसी चोरी केल्याने कळसुली परिसरात खळबळ उडाली आहे.
सध्या भातकापणी हंगाम असल्याने कळसुली- गडगेवाडी येथील विनायक दळवी व कुटुंंबिय भातकापणीसाठी शेतात गेले होते. यामुळे त्यांचे मंगळवारी घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत कपाटातील सोने, चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली. दुपारी 1.15 वा. च्या सुमारास विनायक दळवी यांचा पुतण्या घराकडे आल्यानंतर त्याला घराचा मागील दरवाजा उघडा दिसला. त्याने आत जाऊन पाहिले असता घरातील कपाट उघडे होते. कपड्यांसह सर्व साहित्य पलंगावर अस्ताव्यस्त टाकले होते. त्याने हा प्रकार घरातील इतर मंडळींना सांगताच कपाटातील सोन्याचे दागिने, चांदी आणि रोकड चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. सुमारे साडेबावीस लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविल्याने दळवी कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
सरपंच सचिन पारधिये आणि पोलिस पाटील सारिका कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कणकवली पोलिसांना तात्काळ कळविण्यात आले. पोलिसही काही वेळाने श्री. दळवी यांच्या घरी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी चोरीचे गांभिर्य लक्षात घेवून तात्काळ श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण केले. मात्र सांयकाळी उशिरापर्यंत चोरट्यांचा माग लागला नव्हता. पोलिसांनी त्या परिसरातील दिवसभरातील घडामोडींची माहिती घेतली. कोणी संशयास्पद व्यक्ती दिसली होती का? याचाही तपास केला. कणकवलीचे पोलिस निरीक्षक तेजस नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश शेडगे, हवालदार सुनिल वेंगुर्लेकर तपास करत आहेत.
गेल्या सात, आठ महिन्यात कणकवली शहरासह ग्रामीण भागात अनेक चोर्या झाल्या. मात्र अनेक चोर्यांचा तपास अद्यापपर्यंत झालेला नसून चोरटे मोकाट आहेत. काही महिन्यापूर्वी सांगवे येथे वर्दळीच्या रस्त्यानजिक घरात चोरट्यांनी चोरी करून सुमारे 20 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरले होते. मात्र त्या चोरीचा छडा अद्यापही लागलेला नाही. त्यात पुन्हा दिवसाढवळ्या घरफोडी झाल्याने पोलिस यंत्रणेसमोरही आव्हान निर्माण झाले आहे.