

सध्या गवळदेवाची पूजा आणि वनभोजन गावोगावी सुरू आहे. रविवारी सुट्टीच्या दिवसाच्या मुहूर्तावर गवळदेव पूजा म्हणजे गावात आबालवृध्दांसाठी एक पर्वणीच ठरते. हे सगळं जरी खरं असलं तरी ज्या गुरांच्या रक्षणासाठी गवळदेवाची पूजा केली जाते त्या रानात आता गुरेच नाहीत. कारण शेतकऱ्याच्या दारात आता गुरांचा गोठाच नाही. पॉवरट्रीलर उभे दिसतात. गेल्या पाच वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात गाय, बैल, म्हैस, रेडा या प्रकारातील गुरांची संख्या तब्बल 22 हजाराने कमी झाली आहे.
बैलाची किंमत आता झाली आहे 30 ते 40 हजार रूपये इतकी. त्यात पुन्हा त्याला चारा आणि पाण्याचा खर्च आहेच. वर्षभर त्याला पोसावे लागते. जोतासाठी 2 बैल पोसायचे म्हटले तर बैलाच्या जोडीची किंमत 60 ते 80 हजार पर्यंत मोजावी लागते. त्याशिवाय त्या जोडीच्या पालनाचा खर्च परवडणारा नाही. त्यात पुन्हा ‘आंतर विषार’ झाला तर बैलांचा मृत्यू अटळ असतो. म्हणूनच शेतकरी आता पॉवरट्रीलरकडे वळले. 50 हजार ते सव्वालाख रूपयापर्यंत पावरट्रीलर मिळतो. त्यात सरकारकडून सबसिडी मिळते. आपली भात लावणी झाली की दुसऱ्याच्या शेतात भाड्याने नेता येतो. त्यातून चार पैसे मिळतात. हंगाम संपला की पॉवरट्रीलर सुरक्षित ठेवता येतो. पुन्हा पुढच्या हंगामासाठी तेलपाणी करून वापरता येतो. म्हणून बैलांपेक्षा पॉवरट्रीलर बरा.
जेव्हा बैलजोडीने शेती केली जायची तेव्हा गुरांचे गोठे होते. म्हणून गायी पाळल्या जायच्या. काही ठिकाणी म्हैशी पाळायचे. शेतीवर आधारीत ती जीवशैली होती. मुळात हीच जीवनशैली आता कोकणात संपत आली. शिकला सवरलेला तरूण गावात थांबायला तयार नाही. तो शहरी लाईफस्टाईल जगण्यासाठी आणि रोजगारासाठी शहराकडे जातो आहे. गावात आता तरूण पिढी शेतात दिसत नाही. पन्नाशी नंतरची पिढी काही ठिकाणी मळ्यात दिसते खरी पण त्यांच्या हातात बैलाचे जोत नाही तर पॉवरट्रीलर दिसतो. आता बैलच नाहीत तर गायी, म्हैशी कशाला पाळणार? गुरांचे गोठे आता रिकामे झालेत. गुरांचे गोठेच रिकामी असतील तर रानात गुरे कशी असणार? रानात गुरे चरायला घेवून जाणाऱ्यांची संख्या आता तुरळक आहे. गावातल्या माळरानावर आता चरणारी गुरे दिसत नाहीत. खरे तर रानातल्या गुरांचे रक्षण व्हावे याचसाठी गवळदेवाची पूजा केली जाते.
बऱ्याच ठिकाणी हे गवळदेव रानातच स्थापित झालेले आहेत. देवदिवाळीच्या आसपास या गवळदेवाची पूजा केली जाते. तिथेच दुपारचा प्रसाद बनवला जातो. नैवेद्य दाखवला जातो, अशी ही प्रथा आहे. आता नव्या पिढीने या प्रसादामध्ये अनेक मेनुंचा समावेश केला आहे. तांदळाच्या खिरीच्या जागा जिलेबी, गुलाबजाम असे गोड पदार्थ समाविष्ट व्हायला लागले आहेत. एखाद्या मुलाला प्रतिकात्मक वाघ बनवून तिथून त्याला पिटाळून या सणाची सांगता होते. तेव्हा ‘गुरांचे रक्षण करा’ अशी प्रार्थना गवळदेवाकडे केली जाते. एक परंपरा म्हणून गावकरी ही गवळदेवाची पूजा उत्साहाने करतात खरे, परंतु तोच त्यांचा उत्साह आता गुरांच्या पालनपोषणात राहिलेला नाही. परिणामी गुरांची संख्या घटली आहे.
गेल्या पाच वर्षापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुगणना झाली होती. यावेळी जिल्ह्यात एकूण गुरे होती, 1 लाख 57 हजार 409 इतकी. त्यामध्ये गाय आणि बैल यांची संख्या 1 लाख 6 हजार इतकी होती. म्हैस आणि रेडा प्रकारातील गुरांची संख्या 51 हजार 376 इतकी होती. यावर्षी पशुगणना करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यात गाय आणि म्हैस या दोन्ही प्रकारातील गुरांची संख्या 1 लाख 35 हजार इतकी नोंदली गेली आहे. आता रानात गुरे दिसत नाहीत. काही गुरे पाळणे कठीण झाल्याने शेतकऱ्यांनी ती सोडून दिली आहेत. म्हणून गावातल्या रानमाळावर दिसण्याऐवजी त्यातील काही गुरे शहरांमध्ये मोकाट फिरताना दिसत आहेत.
गावांमधील घरेच बंद पडत चालली आहेत. त्यात पडिक जमिनीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच गावात आता गुरे फारशी दिसत नाहीत. रानात तर ती दिसतच नाहीत. रानात माणूस जात नसल्याने गावातली जंगले गच्च झाली आहेत. जुन्या पायवाटा पुसल्या गेल्या आहेत. त्यातुनही वाट काढत गावकरी रानात स्थापित झालेल्या गवळदेवाची पूजा करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता ही प्रथासुध्दा भविष्यात किती काळ चालेल? हा प्रश्न आहे.