

सगुण मातोंडकर
मालवण :ऐतिहासिक वारसा लाभलेला मालवण तालुक्यातील ओवळीये गावचा ‘घाडीगावकरवाडा’ सांस्कृतिकतेचा आजही साक्षीदार आहे. या वाड्यात गेले तीनशे वर्षे मातीचा सहा फुटी गणपती स्वतः घाडीगावकर कुटुंबीय बनवून प्राणप्रतिष्ठापना करण्याची अविरतपणा सुरू आहे. एकत्र कुटुंबपद्धतीची संकल्पना पिढ्यानपिढया जोपासणारा गणेशोत्सव म्हणूनही हा गणेशोत्सव जिल्ह्यात प्रसिषदिद्ध आहे.
इतिहासात पराक्रम गाजवणार्या घाडीगावकर योद्धाला सिद्धगडाच्या परिसरातील चार गावे इनाम म्हणून मिळाली होती. या पराक्रम घाडीगावकर योद्याचा ओवळीये- वांयगणीवाडी येथील ‘घाडीगावकरवाडा’ प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक परंपरा असलेल्या या घाडीगावकरवाड्यात कोकणातील दशावतार लोककलेचे मुहूर्तमेढ रोवली गेली. संगीत परंपरेतून वारसा मिळालेले डबलबारी भजनी सम्राट नामदेव घाडीगावकर यांचे नाव आजही रसिकांच्या मनात आहे. त्यांचा वारसा आजची घाडीगावकर कुटुंबाची पिढी चालवत आहे.मूर्ती कारागीर म्हणून प्रसिद्ध असलेले घाडीगावकर आजही पिढ्यान् पिढ्या मातीच्या गणेश मूर्ती साकारून वारसा चालवत आहेत.
या वाड्यात तीनशे वर्षांची परंपरा असलेला गणेशोत्सव आजही मोठ्या थाटामाटात अकरा दिवस गुण्या गोविंदात साजरा केला जातो. मातीची गणेश मूर्ती बनवण्याची गणपतीची शाळा चालवण्याचा पिढीजात वारसा घाडीगावकर कुटुंबियांनी आजही सुरु ठेवलेला आहे.
भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिवशी सहा फुट उंच मातीची गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करत घाडीगावकर कुटुंबीयांनी एकत्रित गणेशोत्सवाला सुरुवात करतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निसर्गपूरक गणेश सजावटीची आरास लक्षवेधी ठरली आहे. चाळीस कुटुंबांच्या सहभागातून एकत्रित साजरा होणारा हा गणेशोत्सव एकत्र कुटुंबाचे आदर्श प्रतीक म्हणून जिल्ह्यात प्रसिद्धीस आला आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून अकरा दिवसापर्यंत भजन, फुगडी, गोफ, टिपर्या, दिंडीतून गणेशाची आराधना उत्साही व भक्तीपूर्ण वातावरणात घाडीगावकर कुटुंबीय करतात.
निसर्गाच्या हिरव्यागार मनमोहक वनराईत वसलेला ‘घाडीगावकरवाडा’ कोकणातील सुसंस्कृत संस्कृतीचे दर्शन घडवून आजही प्रेरणा देणारा ठरत आहे. असा हा प्रशस्त घाडीगावकरवाडा वैशिष्ट्यपूर्ण आहे. या वाड्यातील पारंपरिक स्वयंपाक कक्षातील चुलीवर बनवलेल्या स्वयंपाकाचा नैवेद्य गणपतीला दररोज दाखवला जातो. हिंदू धर्मातील गणेशोत्सवासह सर्व सण घाडीगावकर कुटुंबीय एकत्र येऊन साजरे करतात.
घाडीगावकर कुटुंबीय नोकरी धंद्यासाठी मुंबई, पुणे या शहरात स्थिरावले आहेत. मात्र गणेशोत्सवासाठी ते न चुकता दरवर्षी ओवळीये गावी दाखल होतात.