

ओरोस :
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत शुक्रवारी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १५६९ शेतकऱ्यांना ७ कोटी ७७ लाख ९८ हजार ६४४ रुपयांची कर्जमाफी मिळाली. याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहेत. मंत्रालय स्तरावर मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या कार्यक्रमावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तसेच जिल्ह्यातील या योजनेंतर्गत येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी विनंती केली.
या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील ६४२२ शेतकऱ्यांचे प्रस्ताव आतापर्यंत अपलोड करण्यात आले आहेत. पैकी पहिल्या टप्प्यात ३७०८ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले आहेत. त्यातील २२९५ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले असून पैकी १५६९ जणांना कर्जमाफी मिळाली आहे. उर्वरीत शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यावर पुढील काळात कर्जमाफी देण्यात येणार आहे.
या कर्जमुक्ती योजने अंतर्गत पात्र १६९ शेतकरी मयत असून ३३९ खातेधारक देवस्थान / कबुलायतदार जमीन प्रकरातील आहेत. २१५ शेतकरी संमतीपत्राने वाटप तर इतर विविध कारणांमुळे अन्य २४ असे एकूण ७४७ शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, या अपात्र शेतकऱ्यांसाठी शासनाने विशेष सवलत व अटी शिथिल करण्याची मागणी पालकमंत्री नीतेश राणे यांनी केली. यासह फार्मर आईडी काढताना येणाऱ्या अडचणी, खावटी कर्ज पुरवठा बाबत शेतकऱ्यांना कर्जमाफी बाबत त्यांना लाभमिळावा अशी विनंती केली.
जिल्ह्यातील २३० कर्जधारकांच्या आधार प्रमाणीकरणासाठी आवश्यक आधार ऑथेंटिकेशन प्रलंबित आहे. या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू नये, यासाठी मंत्री नीतेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष मागणी केली आहे.
जिल्ह्याच्या भौगोलिक व आर्थिक परिस्थितीचा विचार करून या प्रलंबित व तांत्रिक अडचणीतील प्रकरणांना दिलासा देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी राज्यस्तरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांना ५,०२९ कोर्टी रुपयांचा लाभ वितरण करण्यात आला या कार्यक्रमात ते बोलत होते.
योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत ६४९९ शेतकऱ्यांचे प्रस्ताव अपलोड
पहिल्या टप्प्यात ३७०८ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र
त्यातील २२९५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण
विविध कारणांमुळे ७४७ शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता