

बांदा : बांदा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील इन्सुली-बांदा येथील पोलिस चेकपोस्ट गेल्या तीन दिवसांपासून कमी वीज प्रवाहामुळे अंधुक प्रकाशात कार्यरत आहे. चेकपोस्टवरील लाईट्स सुरू असल्या तरी पुरेशा व्होल्टेजअभावी प्रकाश कमी असून तपासणीस अडथळा निर्माण होत आहे. वीज वितरण केंद्राशी वारंवार संपर्क साधूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने, पोलिस आणि स्थानिक नागरिकांत नाराजी वाढत आहे.
रात्रीच्या वेळेस वाहतूक तपासणी, ओळखपत्र पडताळणी, वाहनांची झडती, सीसीटीव्ही निरीक्षण यांसारख्या महत्त्वाच्या कारवायांमध्ये मंद प्रकाशामुळे अडथळे निर्माण होत आहेत. हे चेकपोस्ट सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर असल्याने येथे दररोज शेकडो वाहनांची तपासणी केली जाते. गुटखा, मद्य व अमली पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी हे चेकपोस्ट अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
तथापि, लाईनमध्ये पुरेसा वीज प्रवाह न पोहोचल्याने संपूर्ण यंत्रणा मंद गतीने चालू आहे. पोलीस कर्मचारी मोबाईल टॉर्चच्या साहाय्याने तपासणी करीत असल्याचे दृश्य तीन दिवसांपासून पाहायला मिळत आहे. वीज वितरण कार्यालयात फोन करून तक्रार नोंदवण्यात आली असली, तरी अद्याप कोणतीही तात्पुरती सोयही करण्यात आलेली नाही.