बांदा : पुढारी वृत्तसेवा
गोव्यावरून रात्रीच्या वेळेस अवैधरित्या गोवा बनावटीच्या दारू वाहतुकी विरोधात बांदा चेकपोस्टवर बांदा पोलिसांनी कारवाई केली.ही वाहतूक गोव्यावरून वसईला करण्यात येणार होती. या कारवाईत गोवा बनावटीच्या मॅकडॉल नं. 1 च्या दारूचे 35 बॉक्स जप्त करण्यात आले असून त्याची किंमत 3 लाख 40 हजार 200 रुपये एवढी आहे. तसेच सुमारे 8 लाख रुपये किंमतीचा ट्रक आणि सहा हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण 11 लाख 46 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी रशीद रहिद मोहम्मद (31, रा. उत्तरप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री 10.30 वा.च्या सुमारास करण्यात आली.
गोव्यातून वसईकडे जाणारा ट्रक बांदा चेकपोस्टवर आला असता बांदा पोलिस कर्मचारी धनंजय गोळे यांनी तपासणीसाठी थांबविण्याचा इशारा केला. चालकाने ट्रक रिकामी असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, धनंजय गोळे आणि विजय जाधव यांना संशय आल्याने ट्रकची नीट तपासणी केली. यावेळी ट्रकच्या मागील हौद्याच्या पुढील बाजूस चोरकप्पा असल्याचा संशय आला.सुमारे दीड फूट अंतराच्या चोरकप्प्यात 35 गोवा बनावटीच्या दारुचे बॉक्स लपवून ठेवलेले आढळून आले. संशयितास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.