

बांदा : इन्सुली-डोबाशेळ येथील महामार्गालगत असलेले घर फोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास करत पोबारा केला. मंगळवारी सायंकाळी 6.30 ते 7 वा. या अर्ध्या तासात हा घरफोडीचा थरारक प्रकार घडला.
स्वागत सावंत व त्यांची पत्नी श्री देवी माऊली मंदिरातील वार्षिक वीणा सप्ताहानिमित्त दर्शनासाठी गेले असता, त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत चोरट्याने ही घरफोडी केली. दर्शनासाठी जाण्यापूर्वी त्यांनी घराला कुलूप लावले होते. मात्र, केवळ अर्ध्या तासात परत आल्यानंतर त्यांनी घरातील लाईट सुरू असल्याचे पाहिले. पुढील दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले तर घरातील मुख्य दरवाजाला आतून कडी लावलेली होती. त्यामुळे चोरट्याने मागील दरवाजाने पळ ल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी शोधाशोध सुरू केली. बांदा पोलिसांनाही याबाबत खबर देण्यात आली. सहा. पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे, उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, कॉन्स्टेबल राकेश चव्हाण, अनिकेत सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला.
चोरीत चोरट्याने अंदाजे 4 हजार रुपये रोख रक्कम व 13 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन असा ऐवज लंपास केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी स्वरा सावंत यांनी बांदा पोलिसांत फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, बुधवारी सिंधुदुर्ग पोलिसांचे श्वान पथकही तपासासाठी दाखल झाले. पुढील तपास बांदा पोलिस करत आहेत.