मृत युवक सांगेलीचा, छातीला लागली गोळी
कोलगाव येथील युवक ताब्यात
आणखी काहींचा सहभागाचा संशय
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये येथील जंगलात शिकारीसाठी गेलेल्या एका 28 वर्षीय युवकाला त्याच्याच सहकार्याच्या बंदुकीची गोळी लागल्याने तो जागीच ठार झाला. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री उशिरा घडला. सचिन मर्गज (वय 28, रा. सांगेली, ता. सावंतवाडी).असे या दुर्दैवी तरुण शिकार्याचे नाव असून या प्रकरणी गोळी झाडणारा संशयित सिप्रियान डान्टस (45, रा. कोलगाव) या युवकाला ताब्यात घेण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार सचिन मर्गज आणि संशयित सिप्रियान डान्टस हे दोघे त्यांच्या काही सहकार्यांसोबत ओवळीये जंगलात शिकारीसाठी गेले होते. शिकार करत असताना हा प्रकार घडला. यात सचिनच्या छातीच्या उजव्या बाजूला बंदुकीची गोळी लागली.
गंभीर जखमेमुळे झालेल्या रक्तस्त्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. याप्रकरणी, सचिनचे वडील सुभाष मर्गज यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. ‘माझ्या मुलाच्या मृत्यूला त्याचे मित्रच कारणीभूत आहेत, असे सांगत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी मागणी केली आहे.
पोलिसांनी संशयित म्हणून कोलगाव येथील सिप्रियान डान्टसला ताब्यात घेतले असून, या घटनेत आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय असून पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान सिप्रियान डान्टस याने आपण गोळी झाडल्याची कबुली दिल्याचे समजते. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत तक्रार नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनेचे वृत्त समजताच सावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी दरम्यान संशयीताचा जबाब नोंदवला असता त्याने आपण गोळी झाडल्याची कबुली दिली. मयत सचिन व आपण गुरूवारी रानडुक्करांचा कळप जंगलातून फिरताना पाहिला होता.
या रानडुक्करांची शिकार करण्यासाठी शुक्रवारी स.11 वा. च्या सुमारास आम्ही ओवळीये जंगलामध्ये गेलो असता. डुक्करांचा मागोवा घेत असताना समोरून रानटी जनावर आल्याचे आपल्याला वाटले, आपण त्या दिशेने गोळी झाडली असता दुद र्ैवाने ती सचिन याला लागली, अशी कबुली संशयित सिप्रियान डान्टस यांने पोलिसांना दिली. सचिन मर्गज व सिप्रियान डान्टस यांची दोस्ती होती, त्यामुळे हा प्रकार अनवधानाने घडलाची शक्यता गावकर्यांकडून व्यक्त होत आहे. सावंतवाडी पोलिसांनी संशयित सिप्रियान डान्टसचा जबाब नोंदवला असून उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्याचे काम सुरू होते.
या दुःखद घटनेचे वृत्त समजताच ओवळीचे माजी सरपंच पंढरी राऊळ, ग्रामपंचायत सदस्य विजय राऊळ यांच्यासह बाळू गावडे, सुनील राऊळ, प्रसाद गावडे, सुनील मर्गज, सदा कदम, श्रीकृष्ण मर्गज, प्रकाश मर्गज, मोहन मर्गज, सतीश लिंगवत, माजी पंचायत समिती सदस्य बाबल अल्मेडा, रामदास मिस्त, सुरेश गावडे, बाबू शेटय, रामचंद्र चव्हाण, भगवान राणे आदींनी घटनास्थळी आणि पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
तालुक्याच्या सह्याद्री पट्ट्यातील वेर्ले, कलंबिस्त, शिरशिंगे, सांगेली, पारपोली, देवसू आदी भागांमध्ये रानडुक्कर आणि ससे यांच्यासह इतर वन्यजीवांची शिकार मोठ्या प्रमाणात केली जाते. या घटनेमुळे अवैध शिकारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वन विभागाने याबाबत कडक पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.