

हुक्केरी : हुक्केरी ग्रामीण वीज सहकारी संघासाठी रविवारी चुरशीने मतदान झाले. चाळीस वर्षांत पहिल्यांदाच या संघाची निवडणूक झाली. वीज संघाच्या ग्राहकांनी स्वयंप्रेरणेने आणि उत्स्फूर्तपणे मतदान केले. सी. एस. तुबची शिक्षण संस्था-हुक्केरी व बापूजी शिक्षण संस्था-यलीमुन्नोळी याठिकाणी मतदान पार पडले.
सायंकाळी 7 पर्यंत एकूण 67 टक्के मतदान झाले. एकूण 60 हजार 64 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान संपल्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली असून रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती.
शनिवारी मुसळधार पाऊस झाला होता. पण, रविवारी पावसाने उघडीप दिली होती. तालुक्यातील संघाच्या ग्राहकांनी सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी रांगेत उभे होते. नऊ वाजता मतदानाला सुरुवात करण्यात आली. कत्ती व जारकीहोळी गटासाठी ही प्रतिष्ठेचा निवडणूक असल्याने मतदान केंद्रांबाहेर अप्पणगौड पाटील पॅनेल व स्वाभिमान पॅनेलचे कार्यकर्ते मतदारांना मतदान करण्याची विनंती करून सहकार्य करत होते.
bहुक्केरी व यमकनमर्डी मतदारसंघातील एकूण 125 गावांतील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 15 संचालकांची निवड करण्यात येणार आहे. या निवडणुकीत 32 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी 112 मतदान केंद्र व 812 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली होती. दुपारी 1 वा. पर्यंत 35 ते 40 टक्के तर सायंकाळी चारपर्यंत 57 टक्के मतदान झाले होते.
रमेश कत्ती व आमदार निखिल कत्ती यांनी सर्वांनी शांततेने मतदान करावे, असे आवाहन करत आमच्या पॅनेलचे 15 ही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.