

कुडाळ : ठाकरे शिवसेनेच्या चक्का जाम आंदोलनाच्या इशार्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीने मुंबई -गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. मात्र, खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाने मलमपट्टी सुरू केली असली तरी महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत सरकारला जागे करण्यासाठी बुधवार 13 ऑगस्ट रोजी हुमरमळा येथे नियोजीत महामार्गावर रोको आंदोलन करणारच असा, निर्धार ठाकरे शिवसेनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी ठाकरे शिवसेना पदाधिकार्यांंनी मुंबई - गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार? असा सवाल करणारे फलक महामार्गावर झळकावले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षातच महामार्गावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. कुडाळ तालुका हद्दीत हुमरमळा, वेताळबांबर्डे पुलानजिक, पणदूर, तसेच वेताळबांबर्डे ब्रीजनजीक जीवघेणे खड्डे पडले आहेत. या ठिकाणी सातत्याने खड्डे पडत असून ठेकेदार कंपनी कडून ते बुजवलेही जातात, मात्र निकृष्ट कामामुळे खड्डे पुन्हा-पुन्हा डोके वर काढत असल्याने हायवे अधिकारी आणि ठेकेदाराची डोकेदुखी वाढत आहे.
वारंवार पडणार्या या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. वेताळबांबर्डे पुलानजिक तसेच अन्य ठिकाणी महामार्गाचे काम अर्धवट आहे. याची दखल घेत ठाकरे शिवसेनेने ‘महामार्ग रोको’आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
या नुसार 13 ऑगस्ट रोजी हुमरमळा येथे महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे शिवसेना पदाधिकार्यांनी दिला आहे. या इशार्यानंतर महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनी खडबडून जागी झाी आहे. महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले असून, कुडाळ हद्दीत महामार्ग दुरुस्तीचे काम गेले दोन दिवस जोरात सुरू आहे.
हुमरमळा येथील खड्डे बुजविल्यानंतर, रविवारी सकाळी पणदूर येथील खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते. आधी बसविलेले पेव्हर ब्लॉक काढून, पावसाळी डांबराच्या सहाय्याने खड्डे बुजविण्यात येत आहेत.
जरी खड्डे बुजविण्यास सुरूवात झाली असली तरी अशाप्रकारची मलमपट्टी यापूर्वी अनेकदा झाली आहे. तरीही खड्ड्यांची समस्या कायम आहे. तसेच महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण होण्यासाठी आणि चाकरमानी गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी ‘चक्का जाम’ आंदोलन छेडत सरकारला जागे केले जाणार आहडे. यासाठी 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. महामार्गावर हुमरमळा येथे ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात येणार असल्याचे फलक ठाकरे शिवसेनेने महामार्गावर झळकवले आहेत.
मुंबई गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? असे फलक महामार्गावर झळकवत आंदोलनाचा इशारा दिला आहे.