आचरा : समुद्रातील वादळी वातावरण काहीसे शांत होताच बेकायदेशीर परप्रांतीय ट्रॉलर्सनी तोंडवळी-तळाशील किनारी सागरी हद्दीत अगदी दिवसाढवळ्या मासेमारी करून धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. गणेश चतुर्थी काळातही ही मासेमारी बिनदक्त सुरू होती. समुद्रात हे ट्रॉलर्स 12 सागरी मैलाच्या आत येऊन बेकायदेशीरपणे मासेमारी करत आहेत. वारंवार लक्ष वेधूनही मत्स्य विभागाकडून त्यांच्यावर कारवाई होत नाही. मत्स्य विभाग कारवाई करत नसेल, तर हे ट्रॉलर्स पकडण्यासाठी स्थानिक मच्छीमार समुद्रात उतरणार असून यातून संघर्ष झाल्यास त्याला मत्स्य विभाग जबाबदार राहिले, असा इशारा स्थानिक मच्छीमार संजय केळुस्कर यांनी दिला आहे.
रत्नागिरी ते सिंधुदुर्गपर्यंतचा सागरी पट्टा मासेमारीसाठी गोल्डन पॉईंट मानला जातो. हंगामाच्या सुरुवातीला पापलेट, बळा, बांगडा, म्हाकूल, कोळंबी आदी किंमती मासळी या भागात मिळते; पण स्थानिक मच्छीमारांच्या जाळ्यात हे मत्स्यधन येण्या अगोरद शेकडोच्या संख्येने येणारे परराज्यातील हायस्पीड टॉलर्स त्यावर डल्ला मारतात व स्थानिक मच्छीमारांच्या तोंडचा हक्काचा घास हिरावतात. मत्स्य हंगामाच्या सुरुवातीला समुद्र शांत होताच मोठ्या हायस्पीड ट्रॉलर्सच्या अतिक्रमणाचा प्रश्न स्थानिक मच्छीमारांना दरवर्षीच भेडसावू लागला आहे. स्थानिक मच्छीमारांच्या व्यवसायाचे संरक्षण करण्याच्या द़ृष्टीने महाराष्ट्र शासन आणि मत्स्य विभाग कोणत्याही ठोस उपाययोजना करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
1 ऑगस्टपासून महाराष्ट्रातील सातही सागरी जिल्ह्यांसाठीअत्याधुनिक गस्ती नौका सज्ज असतील, असा दावा शासनाकडून करण्यात आला होता. मात्र त्यानंतर दोन महिने उलटले तरी या गस्ती नौका दाखल न झाल्याने गस्ती नौका नेमक्या आहेत तरी कुठे?असा संतप्त सवाल स्थानिक मच्छीमारांकडून केला जात आहे.
वारंवार मत्स्य विभागाकडे तक्रार करूनही हा विभाग परप्रांतिय नौकांवर कारवाई करण्याकडे डोळेझाक करत आहे. मत्स्य विभागाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नाही. जर मत्स्य विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल, तर स्थानिक मच्छीमार समुद्रात उतरून या टॉलर्सना अटकाव करतील. यावेळी समुद्रातील संघर्ष अटळ असून या संघर्षास पूर्णपणे मत्स्य विभाग जबाबदार असेल, असा इशारा तळाशील येथील मच्छीमार संजय केळुस्कर यांनी दिला आहे.