

हरकुळखुर्द : हरकुळखुर्द - खालची तेलीवाडीतील विद्यार्थ्यांना व अंगणवाडीतील बालकांना चिलखलयुक्त बांधावरून जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. केवळ दोन फूट रुंद हा कच्चा मातीच्या चिखलयुक्त बांध अनेक वेळा पाण्याखाली असतो. या पाण्यातूनच या विद्यार्थ्यी जीव धोक्यात घालून शाळेतून ये-जा करतात. या परिस्थितीमुळे अनेक शेतकरी, मजूर पालकांना आपली कामे टाकून मुलांना शाळेत ने-आण करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. याबाबत ग्रामस्थांनी शासन व स्थानिक प्रशासनाकडे या पायवाटेचे रूपांतर पक्क्या रस्त्यात करण्याची मागणी करत आहे. परंतु शासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
येथील ग्रामस्थ चंद्रकांत खानविलकर, ज्ञानेश्वर खानविलकर, दीपक खानविलकर, प्रदीप तेली, तुकाराम तेली, रमेश खानविलकर, महेश तेली, शंकर तेली आदीनी ही कच्ची पायवाट पक्का रस्ता करण्याची मागणी केली आहे.
याबाबत हरकुळखुर्द तेलीवाडी शाळा नं.5 चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास खानविलकर म्हणतात, या जि.प.शाळेची पटसंख्या आधीच कमी आहे. पावसाळ्यात तर या धोकादायक पायवाटेमुळे शाळेत येणार्या मुलांची संख्या आणखीनच कमी होते. येथील मुलांच्या शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे शासनाने आमच्या मुलांना सुरक्षित रस्ता करुन द्यावा, अशी मागणी केली आहे.