

वैभववाडी : वैभववाडी पोलिसांनी 74 हजार रुपये किमतीचा विमल गुटखा व गुटखा वाहतूक करणारी सुमारे 50 हजार रुपये किंमतीची मारुती ओमनी गाडी असा सुमारे 1 लाख 24 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी उदयकुमार शिनू देवर (रा. फोंडाघाट, ता. कणकवली) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी पावणेबारा वाजता एडगाव-इनामदारवाडी फाट्याजवळ करण्यात आली.
गेले चार पाच दिवस वैभववाडी पोलिसांनी एडगाव फाटा येथे नाकाबंदी सुरू केली आहे. मंगळवारी सकाळपासून याठिकाणी पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या सूचनेनुसार नाकाबंदी करण्यात आली होती. दरम्यान दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास वैभववाडीकडून उंबर्डेकडे जाणारी पांढर्या रंगाची मारुती ओमनी कंपनीची गाडी ड्युटीवर असलेले पोलिसांनी थांबवत गाडीची तपासणी केली.
या गाडीत विमल गुटख्याच्या बॅग सापडल्या. पंचांसमक्ष गाडीतील गुटख्याच्या बॅग व मारुती ओमनी कंपनीची गाडी ताब्यात घेऊन वैभववाडी पोलिस ठाणे येथे आणून चालक उदयकुमार देवर याच्यावर अन्नसुरक्षा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस कॉन्स्टेबल सागर मासाळ, समीर तांबे,महिला पोलिस कॉन्स्टेबल दिपाली राठोड, संदीप राठोड, हरीष जायभाय, सहायक पोलिस उपनिरीक्षक राजन पाटील, फक्रुद्दीन आगा यांच्या पथकाने केली.