

वैभववाडी : वैभववाडी बाजारपेठेतील एका हार्डवेअर दुकानासमोर हुंडाई कंपनीची एक बेवारस कार शनिवारी सायंकाळी आढळून आली. वैभववाडी पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली आहे.
प्राथमिक माहितीनुसार शुक्रवारी सकाळी या हार्डवेअर दुकानासमोर एक पांढर्या रंगाची हुंडाई कंपनीची गाडी रस्त्याच्या कडेला उभी असल्याचे काही दुकानदारांच्या निदर्शनास आले. मात्र गाडी कोल्हापूर पासिंग असल्यामुळे कुणीतरी व्यापारी गाडी लावून बाजूला गेला असेल असे समजून त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र शनिवारी सकाळी सुध्दा गाडी त्याच ठिकाणी उभी असल्याचे व्यापार्यांच्या लक्षात आले. शनिवारी सायंकाळी याबाबत वैभववाडी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली.
तसेच त्या गाडीच्या नंबर वरून गाडीच्या मालकाशी संपर्क साधला असता सदर गाडी मालकाने गुरुवारी दुपारी कोल्हापूर जेलच्या सर्विसिंग सेंटरवर गाडी सर्विसिंगला दिली होती. त्या ठिकाणाहून सर्व्हिसिंग करणार्या एका कैद्याने ही गाडी घेऊन पसार झाला आहे. याबाबत सदर मालकांने गाडी चोरीची कोल्हापूर येथे पोलिसांत तक्रार दिली आहे.
गाडी घेऊन पाळलेला कैदी हा आंबोली येथील खून प्रकरणातील कैदी असल्याचे समजते. गाडी सह जेलमधून कैदी पळाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. ही गाडी वैभववाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.