

माणगाव : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या नामाचा जप करत शेकडो भाविक भक्तानी माणगाव दत्त मंदिरात हजेरी लावली. दत्त भक्तांच्या उपस्थितीने मंदिर परिसर भक्तीमय वातावरणात न्हावून गेला. गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत हजारो भक्तांनी श्री दत्तगुरु व टेंबे स्वामी महाराज यांच्या जन्मस्थानी दर्शन घेतले.
माणगाव दत्त मंदिर हे प्रसिद्ध दत्तक्षेत्र आहे. परम पुज्य टेंबे स्वामीं महाराजांच्या जन्मस्थानामुळे या स्थानाची महंती देशभर पसरली आहे ; त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात सिंधुदुर्गसह राज्यभर तसेच गुजरात,गोवा,बेळगाव आदी ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात दत्तभक्त येथील प्रत्येक कार्यक्रमात दर्शनासाठी आवर्जून उपस्थित राहतात. यावर्षी गुरूवार व गुरुपौर्णिमा असा योग जुळून आल्याने मंदिरात सकाळपासूनच दत्तभक्तांची गर्दी सुरू झाली होती.
मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रींचे जन्मस्थानी सकाळी अभिषेकपूजा, महर्षी व्यासपूजा झाली.दुपारी आरती, तीर्थप्रसाद आणि श्री दत्त मंदिर येथे सकाळी अभिषेक पूजा, महापूजा, दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी आरती व तीर्थप्रसाद व महाप्रसाद. दुपारी ह. भ .प . कौस्तुभ सरदेसाई (रत्नागिरी) यांचे तर संध्याकाळी ह. भ. प. दत्तात्रय उपाध्ये यांचे कीर्तन झाले.
सायंकाळी उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली होती. मंदिर परिसरात वाहतूक कोंढी होऊ नये यासाठी स्थानिक पोलिसांनी मुख्य रस्त्यापाशीच वाहतुकीचे नियोजन केलं होते. त्यामुळे भक्तांने सुलभपणे दर्शन घेता आले. दत्तमंदिर व परिसरात विश्वस्तांकडून काटेकोर नियोजन करण्यात आले होते. गेली सलग 21 वर्षे या मंदिरात गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी ब्रह्मवृंद एकत्र येत सेवा करतात. या वर्षीही या ब्रह्मवृंदांनी आपल्या सेवेची परंपरा जोपासली.