

ओरोस : जिल्ह्यातील अनधिकृत वाळू उत्खनन करणार्या माफियांवर येत्या आठवडाभरात कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन देतानाच स्वातंत्र्यदिनी होणारी संभाव्य आंदोलने यशस्वीपणे हाताळत पालकमंत्री नितेश राणे यांनी अनेक उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढला आहे. त्यांच्या या यशस्वी शिष्टाईमुळे 111 पैकी 50 हून अधिक आंदोलकांनी आपली उपोषणे मागे घेतली आहेत.
आपल्या विविध मागण्या व समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा इशारा दिला होता. यासंबंधीची सुमारे 111 निवेदने जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली होती. या गंभीर परिस्थितीची दखल घेत स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री नितेश राणे यांनी उपोषणकर्त्यांशी थेट संवाद साधला.
या बैठकीत अतिक्रमण, देवस्थान जमिनी, रस्ते, वीजपुरवठा, आरोग्यसेवेतील त्रुटी अशा अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत जिल्हाधिकारी अनिल पाटील, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनिष दळवी, पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी अनेक प्रश्नांवर जागेवरच तोडगा काढल्याने सुमारे 50 जणांनी समाधान व्यक्त करत आपले आंदोलन मागे घेतले. ज्यांच्या शंकांचे निरसन झालेले नाही, त्यांच्याशी उद्या पुन्हा भेटून त्यांचेही समाधान करण्याचा प्रयत्न करू, असे राणे यांनी स्पष्ट केले. या बैठकीमुळे प्रशासनावरील मोठा ताण कमी झाला असून, पालकमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत होत आहे.