

ओरोस : पगाराच्या फरकाची रक्कम गेले दहा महिने झाली तरी ग्रामपंचायतीच्या कर्मचार्यांना मिळालेली नाही. तसेच गेले चार महिने वेतन नाही, अशी तक्रार मांडत मंगळवारी ग्रामपंचायत कर्मचार्यांनी सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन छेडले. वेतन मिळाले नाही, तर 15 ऑगस्टपासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी ग्रा. पं. कर्मचार्यांनी दिला.
आम्हा ग्रामपंचायत कर्मचार्यांचा गेले दहा महिन्यांचा फरक शासनाकडून एप्रिलमध्ये जमा झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, अद्याप या फरकाची रक्कम आमच्या खात्यात जमा झालेली नाही, शिवाय गेले चार महिने आम्हाला वेतन मिळालेले नाही. पालकमंत्र्यांसोबत भेटीत त्यांनी तत्काळ वेतन जमा करू, असे आश्वासन दिले होते.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने मंगळवारी कर्मचार्यांच्या वेतन व फरक रक्कम जमा करावी, या मागणीसाठी जि. प. समोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ परब, सचिव अभय सावंत, मनोज सावंत, हनुमंत चव्हाण, वसंत परब, संदीप जाधव, समीर सावंत, बापू घाडी आदींसह जिल्ह्यातील सुमारे 500 हून अधिक कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
दरम्यान उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम.पं.)जयप्रकाश परब यांच्या समवेत संघटनेच्या पदाधिकार्यांची बैठक झाली. या बैठकीत जयप्रकाश परब यांनी येत्या चार दिवसात फरकाच्या रकमेसह वेतन खात्यात जमा करू, असे आश्वासन दिले. यावेळी शिंदे शिवसेनेचे कुडाळ तालुकाप्रमुख दीपक नारकर, योगेश घाडी, देवेंद्र सामंत, विनायक राणे, देवेंद्र नाईक, साई दळवी आदींसह शिंदे सेनेच्या पदाधिकार्यांनी याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा केली तसेच या कर्मचार्यांना त्यांचे फरकाच्या रक्कम आणि वेतन तात्काळ जमा करा, अशी मागणी लावून धरली.
ग्रा. पं. कर्मचार्यांच्यामागील नऊ महिन्याचा वेतन फरक आणि वेतन असे साडेचार लाख रुपये शासनाकडून जमा असून सदरची रक्कम फरकासह येत्या चार दिवसात प्रत्येक कर्मचार्यांच्या खात्यावर पंचायत समिती मार्फत जमा केली जाईल, असे आश्वासन ग्रा.पं. कर्मचारी युनियन, शिंदे शिवसेनेसमवेत झालेल्या बैठकीत दिले.
दरम्यान, सोमवारी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी ही रक्कम प्राप्त झाल्याचे सांगितले.खात्यात जमा झाल्याचेही वृत्त प्रसिद्ध झाले. परंतु अद्यापपर्यंत वेतन व फरक रक्कम जमा झाले नाही. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, प्रशासनाने याची दखल न घेतल्यास आम्हाला 15 ऑगस्ट रोजी उपोषण करावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन सिंधुदुर्ग शाखेचे अध्यक्ष विश्वनाथ परब व सचिव अभय सावंत यांनी दिला.