

बांदा : सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने भालावल परिसरात केलेल्या धडक कारवाईत गोवा दारूची तस्करी करणार्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. डेगवे-विलवडे मार्गावर मध्यरात्री राबवलेल्या या कारवाईत पोलिसांनी सुमारे 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चार आरोपींना अटक केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे 1.20 वा. च्या सुमारास भालावल येथील दळवी यांच्या बागेजवळ एलसीबी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला होता. यावेळी संशयास्पद कार पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना पाहताच कारमधील दोघांनी अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने पळ काढला. तत्काळ पाठलाग करत पोलिसांनी त्यांना काही अंतरावर जेरबंद केले.
तपासणीदरम्यानकारमध्ये गोवा बनावटीची 2 लाख 4 हजार रुपये किमतीची विदेशी दारू आढळून आली. तसेच सुमारे 12 लाख रुपये किमतीची टाटा नेक्सॉन कार ताब्यात घेण्यात आली. विशेष म्हणजे, या वाहनाला दोन वेगवेगळ्या नंबर प्लेट लावण्यात आल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. कारवर दर्शवण्यात आलेली एमएच-09-डीएफ-6529 ही नंबर प्लेट बनावट असल्याचे निष्पन्न झाले असून, वाहनाची मूळ नोंदणी एपी-04-बीयू-8008 (आंध्रप्रदेश) अशी असल्याचे तपासात स्पष्ट झाले.
या प्रकरणी शेख तौफी रफीवाली (24, रा. तपोवन), पेयला कोंडारेड्डी (रा. अनंतपूर), वेण्णापुसा भास्कर रेड्डी (रा. यादीकि) आणि नागिरेड्डी गरी दिलीपकुमार (रा. आत्मापूर, सर्व रा. आंध्रप्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, तसेच पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत हेड कॉन्स्टेबल बस्त्याव डिसोझा, विल्सन डिसोझा आणि आशिष जामदार यांचा सहभाग होता. आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्यांना बांदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.