

बांदा : सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी इन्सुली-कोठावळेबांध येथे केलेल्या दोन स्वतंत्र कारवाईमध्ये कारवाई करत 5 लाखांच्या गोवा दारूसह दोन आलिलशान के्रटा कार मिळून सुमारे 29 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या दोन्ही कारवायांमध्ये मिळून सहा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकाला अटक करण्यात आली असून एका फरार अज्ञाताचा शोध सुरू आहे.
24 सप्टेंबर रोजी पहाटे 5.15 वा. व सकाळी 7.30 वा. कोठावळेबांध-इन्सुली येथे मुंबई-गोवा महामार्गावर एकाच जागी करण्यात आली. पहाटे केलेल्या कारवाईत कारचालक महेश मारुती मोरये (रा. नांदगाव, ता. कणकवली) यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यासह एका फरार अज्ञाताविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (अ, इ), 81, 83 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळी 7.30 वा. केलेल्या कारवाईत ओमकार अनिल गावकर, सद्गुरू पाटील, सतीश करंगुटकर, जतीन गावडे (सर्व रा. सावंतवाडी) व अक्षय खटावकर (रा. राजापूर, जि. रत्नागिरी) या पाच जणांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 अ, इ, 81, 83 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर व अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहा. उपनिरीक्षक सुरेश राठोड, हवालदार विल्सन डिसोजा, सदानंद राणे, डॉमेनिक डिसोजा, जॅक्सन घोन्साल्विस, आशिष जामदार व पोलिस अंमलदार महेश्वर समजिसकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.