

नागेश पाटील
सावंतवाडी : अवैधरित्या गोवा राज्यातून महाराष्ट्र राज्यात होणारी दारू तस्करी रोखण्यासाठी गोवा राज्य सरकार त्यांनी उत्पादित केलेल्या दारूच्या बाटल्यांवरील बुचांवर होलोग्राम स्टिकर्स लागणार आहे. तसा प्रस्ताव गोवा सरकारने तत्वतः मंजूर केला असून राज्यांच्या सिमांवर चेकपोस्ट उभारून हे स्टिकर्स तपासले जातील त्यानंतरच गाडयांना मार्गस्थ होण्याची परवानगी दिली जाईल. या निर्णयामुळे गोवा बनावटीच्या दारू तस्करीवर मोठया प्रमाणावर निर्बंध येण्याची शक्यता आहे.
गोवा राज्यातून होणारी मोठ्या प्रमाणावरील दारू वाहतूक रोखण्यासाठी तसेच नकली दारू बनवून लाखो कोट्यवधी रुपयांचा महसूल बडवून गोवा सरकारचे नुकसान करणार्यावर शिकंजा कसण्याकरिता गोवा राज्य सरकारने नागालँड सरकारच्या धर्तीवर होलोग्राम स्टिकर्सची लावण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा राज्य सरकार व अबकारी खात्याने तसा प्रस्ताव शासनाला दिला आहे. गोवा बनावटीच्या दारूची परराज्यात मोठी तस्करी केली जाते. महाराष्ट्र व इतर राज्यांच्या तुलनेत गोवा बनावटीच्या दारूचे दर स्वस्त आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या दारूची बेकायदा वाहतूक होते.
दारुमध्ये बहुतांशी प्रमाणात अल्कोहोल न वापरता त्याऐवजी स्पिरिट वापरून त्याला गोवा सरकारचे लेबल लावून नकली दारू तयार केली जाते त्याचे रॅकेट ही कार्यरत आहे. यामुळे गोवा सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आदी राज्यांमध्येही गोवा दारूला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे दारू तस्करी देखील जोरात होते ती रोखण्यास गोवा राज्य उत्पादन शुल्क विभाग अपयशी ठरत आहे.
महाराष्ट्रात गोव्याची दारू आणून विकल्याने त्याचा स्थानिक दारू उत्पादन विक्री व्यवसायावर मोठा परिणााम होत असून महाराष्ट्र राज्याचा महसूल देखील बुडत आहे. आता गोवा सरकार अवैध दारू तस्करी, नकली दारू विक्री रोखण्यासाठी होलोग्राम स्टिकर्स गोवा दारूच्या प्रत्येक बाटलींवर लावले जाणार आहेत. दारू वाहतूक करणार्या गाडयांवरही हे स्टिकर लावणे बंधणकारक आहे त्यामुळे अवैध दारू वाहतूक होवू शकणार नाही. राज्यांच्या सीमांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी नाके उभारण्यात येतील बाटल्यांवरील होलोग्राम स्टिकर चेक करून त्यानंतरच गाड्या सोडण्यात येणार आहेत.
गोवा राज्यात उत्पादित केलेल्या दारूच्या प्रत्येक बाटल्यांवरील बुचांवर हे होलोग्राम स्टिकर्स लावण्यात येतील या बुचांवरील स्टिकर मध्ये एक क्यू आर कोड देण्यात आला आहे. हा कोड स्कॅन केल्यावर त्या दारूशी संबंधित सर्व माहिती ट्रॅक सिस्टीममध्ये उपलब्ध होणार आहे. यात दारूच्या उत्पादन त्याचा दर्जा, कुठे तयार केली, फॅक्टरी नंबर व बनविणारी कंपनी आदी संपूर्ण माहिती मिळणार आहे. या होलोग्राम स्टीकर वरून ती दारू कोणत्या दुकानातून खरेदी केली गेली कोणा कोणाला पुरवठा केला गेला, याचीही तातडीने माहिती मिळणार आहे त्यामुळे अवैध दारू वाहतूक आणि नकली दारू बनवून त्याची विक्री करणार्यांवर बरेच निर्बंध येणार आहेत. नव्या वित्तीय वर्षापासून गोवा दारूच्या सर्व उत्पादित मालांवर हे होलोग्राम स्टिकर्स लावण्याची कार्यवाही सुरू केली जाईल या निर्णयामुळे दारू तस्करी रोखणे शक्य होणार आहे.